शिराळा : काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कारकीर्दीत झालेली पापे धुण्यासाठी आमची पाच वर्षे गेली आहेत. आता आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र बनविण्यासाठी युतीची सत्ता केंद्रात येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जर काँग्रेस आघाडीची सत्ता आली, तर काश्मीर देशापासून तुटेल, असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिराळा येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव नाईक, धैर्यशील माने, अॅड. भगतसिंग नाईक, राहुल महाडिक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, अभिजित नाईक, जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, उदयसिंह नाईक, अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाकरे म्हणाले, शिवसेना व भाजप यांचे एकत्र सरकार असतानाही आम्ही योग्य कामासाठी साथ व चूक तेथे विरोध करत होतो. आमच्यातील वाद हा सत्तेसाठी नव्हता, तर जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न होता. ज्यात आम्ही यशस्वी झालो.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, आम्ही जिवंत नागाची पूजा करतो, मात्र कुणी डिवचले तर सोडत नाही. आमच्यावर टीका करणारे वाळव्याच्या नेत्याच्या जिवावर नाचत आहेत. अॅड. भगतसिंग नाईक, भरत गराडे, स्वप्नील निकम, नीलेश आवटे, विद्याधर कुलकर्णी, प्रकाश पाटील यांनीही विचार मांडले. सभेस देवयानी नाईक, राजश्री यादव, सत्यजित कदम, विकास देशमुख, वैभवी कुलकर्णी, सीमा कदम उपस्थित होते.