मुंबई - लोकसभा निवडणुकीत प्रत्येकांन मतदान करावे यासाठी विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत आहे. आजही अनेक जण मतदानाच्या दिवशी मिळालेली सुट्टी मतदान न करता बाहेरगावी घालवतात. माझ्या एका मताने काय होणार, अशी अनेकांची भावना असते. मात्र भारताच्या इतिहासात अनेकांना एका मतामुळे पराभव पत्करावा लागला आहे. या एका मताची किंमत या उमेदवारांना नक्कीच कळली असेल.
कर्नाटकमध्ये २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल धर्मनिरपेक्षचे उमेदवार ए.आर. कृष्णमूर्ती यांचा काँग्रेसच्या आर. ध्रुवनारायण यांच्याविरुद्ध संथेमाराहल्ली दक्षिण मतदार संघातून एका मताने पराभव झाला होता. कृष्णामूर्ती यांना ४०७५१ मते मिळाली होती. तर ध्रुवनारायण यांना ४०७५२ मते पडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, कृष्णमूर्ती यांनी आपल्या ड्रायव्हरलाच मतदान करण्यापासून रोखले होते.
राजस्थानमध्ये २००८ विधानसभा निवडणुकीत देखील अशी घटना घडली होती. राजस्थान काँग्रेसचे प्रमुख सी.पी. जोशी यांचा भाजपच्या कल्याणसिंह चौहान यांच्याविरुद्ध एका मताने पराभव झाला होता. जोशी यांना ६२२१५ तर चौहान यांना ६२२१६ मते मिळाली होती. जोशी यांची आई, बायको आणि ड्रायव्हर यांनी मतदान केले नव्हते. त्यामुळे मतदान करण्याचे महत्त्व जोशी यांना खऱ्या अर्थाने कळले यात शंका नाही.
मुंबई महानगर पालिकेत २०१७ मध्ये अशीच घटना घडली होती. महापालिकेतील २२० वार्डमधील उमेदवारांना एका मताचे महत्त्व नक्कीच कळले असेल. या निवडणुकीत सुरुवातीला शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांचा विजय झाला होता. परंतु, भाजप उमेदवार अतुल शाह यांनी नव्याने मतमोजणी घेण्याची मागणी केली. त्यात दोघांना प्रत्येक ५९४६ मते मिळाली होती. त्यानंतर लॉटरी काढण्यात आली. यामध्ये नगरसेवक पदाची माळ शाह यांच्या गळ्यात पडली होती. परंतु या ठिकाणी दोघांपैकी एकाला एक मत मिळाले असते, तरी निकाल वेगळाच राहिला असता. या घटनांवरून एक मत किती महत्त्वाचे हे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या महत्त्वपूर्ण मताचे दान करायलाच हवे.