मुंबई - सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आयपीएल स्पर्धा देखील सुरू आहे. क्रिकेटमध्ये प्रचाराचा धुराळा दिसत नसला तरी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात षटकरांची आतषबाजी रोज होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती मतदार संघाच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी एका सभेत महिलांना फ्रंटफुटवर अर्थात पुढे येऊन षटकार लगावण्याचा सल्लाच दिला आहे.
बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. सध्या सुप्रिया सुळे मतदार संघात प्रचार सभा घेत असून अनेकदा त्या सत्ताधारी भाजपला उघड आव्हान देत आहे. एका सभेत त्यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. कोणी खोटे आरोप केल्यानंतर आपण अजिबात ऐकूण घेणार नाही. मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
यावेळी त्या म्हणाल्या की, आपण नेहमीच बॅकफुटवर खेळतो. फ्रंट फुटला आपल्याला खेळायची कसली भिती आहे, असा प्रश्न उपस्थित करताना महिलांनी बिनधास्त पुढे येऊन षटकार मारावा, असं आवाहन सुप्रिया यांनी केले. त्यांच्या वक्तव्यनंतर बारामतीमध्ये सध्या सुप्रिया सुळे यांचा सिक्सर फंडा चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे सुप्रिया आगामी काळात आणखी आक्रमक प्रचार करणार हे त्यांच्या सिक्सर फंड्यावरून दिसून येते. याआधी सुप्रिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देताना बारामतीच्या नादी न लागण्याचा सल्ला दिला होता.
दुसरीकडे कांचन कुल यांनी देखील आपण राजकारणाच्या जागी राजकारण आणि नात्यांच्या जागी नाते ठेवून वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. . सुनेत्रा पवार आपल्या आत्या आहेत. उस्मानाबादमध्ये राणा जगजितसिंह आणि ओमराजे निंबाळकर हे माझे चुलत भाऊ एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने मला उमेदवारी दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असले तरी राजकारणाच्या जागी राजकारण आणि नात्यांच्या जागी नाती ठेवूनच आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.