मुंबई - सरकारविरुद्ध अनोख्या पद्धतीने आंदोलने करून आपल्या मागण्या मान्य करून घेणारे अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांना यवतमाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळमध्ये झालेल्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी विधवा महिलांचे आणि सारस्वतांच्या समस्या निर्धास्तपणे मांडणाऱ्या वैशाली येडे यांचे नाव चर्चेत आहे. यासाठी संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. परंतु वैशाली येडे यांच्याकडून या संदर्भात अद्याप होकार कळविण्यात आलेला नाही.
महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. याच जिल्ह्यात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्यावेळी शेतकरी महिला वैशाली येडे यांनी उद्घाटक म्हणून शेतकरी समस्या आणि शेतकरी विधवा महिलांच्या समस्या मांडल्या होत्या.
वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. तसेच एका वर्षापासून त्या नाटक क्षेत्राशी निगडीत आहेत. दरम्यान यवतमाळ-वाशीम मतदार संघातून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांनी संधी मिळण्याची शक्यता आहे.