मुंबई - अनोख्या पद्धतीने आंदोलने करून आपल्या मागण्या मान्य करून घेणारे प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू सर्वांनाच ठावूक आहे. आता 'प्रहार'च्या लोकसभा उमेदवार देखील अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. प्रहारच्या यवतमाळ-वाशीम मतदार संघातील उमेदवार वैशाली येडे सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करून आपला प्रचार करीत आहेत. त्यांचे बसने प्रवास करतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केली. त्यानंतर त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. वैशाली या बसने फिरून स्वत:चा प्रचार करत आहेत. वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असून त्या यवतमाळ जिल्याच्या कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने ७ वर्षांपूर्वी सततची नापिकी व कर्जास कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली होती. दुःखावर मात करत दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा मांडण्याचे काम केले आहे.
यवतमाळ येथील नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय साहित्य सनमेलनाचे उदघाटन वैशाली यांच्या हस्ते झाले होते. त्यांचा हा लढा पाहून आमदार बच्चू कडू यांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. आमदार कडू देखील आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. आता बसने प्रचार करून वैशाली देखील चर्चेत आल्या आहेत.