मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालनंतर देशात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास पंतप्रधान पदासाठी भाजप नेते नितीन गडकरी यांचे नाव समोर येते. त्याचवेळी पंतप्रधानपदासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाची देखील अधुनमधून चर्चा रंगत असते. मात्र या दोघांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आल्यापासून आपल्याला त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते, असं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले. एक मुलाखतीत शरद पवार बोलत होते.
अनेक सर्व्हेमधून देशात त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत एनडीएला गडकरी एकसंध ठेवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच गडकरी संघाच्या जवळचे असून ही त्यांच्यासाठी जमेची बाब ठरेल अस मत अनेकांचे आहे. त्यामुळे गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी समोर येत असते. मागील काही दिवसांत गडकरी देखील सरकारला घरचा आहेर देताना दिसले आहेत. दुसरीकडे राजनाथ सिंह भाजपचे ज्येष्ठ नेते असून पंतप्रधान म्हणून मोदी नसले तर राजनाथ असंही अनेकांना वाटते. यावर पवारांनी आपले मत स्पष्ट केले.
गडकरी आणि राजनाथ यांचे नाव समोर आल्यास त्यांची काळजी वाटते. गडकरी माझे चांगले मित्र आहे. राजनाथ सिंह देखील भला माणूस आहे. मात्र त्यांचे नाव आल्यास त्यांच्या भवितव्याबाबत चिंता वाटते. सध्या मोदी आणि अमित शाह यांच्याकडे भाजपची सुत्रे आहेत. ज्यावेळी गडकरी, राजनाथ यांचे नाव पंतप्रधानपदासाठी समोर येईल, त्यावेळी भाजपचे सुत्रधार या दोघांसोबत काय करतील, हे आपण सांगू शकत नाही, अशी भितीही पवार यांनी व्यक्त केली.