मुंबई - लोकसभा निवडणुकीतमहाराष्ट्रातील निवडणुका चुरीशीच्या ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यातील एकमेकांवर होणाऱ्या शाब्दिक टीका प्रत्येक सभेत पहायला मिळत आहे. मोदींनी वर्ध्यातील सभेत शरद पवारांच्या कुटुंबात वाद सुरु असल्याचे विधान केले होते. भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मात्र पवार कुटुंब घट्ट राहावे यासाठी शुभेच्छा देत आहे.दरम्यान पंकजा मुंडे यांनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या दाव्याला फाटा देत पंकजा यांनी पवार कुटुंबियांना घट्ट राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पवार कुटुंबाचे विभाजन होऊ नये, यासाठी प्रार्थना केली. तसेच कुणाचं घर फोडून फटाके फोडण्याची सवय आम्हाला नाही, असा टोला देखील राष्ट्रवादीला लगावला. तसेच आमच्या भावाला कुटुंबासोबत कसं राहतात, हे शिकविण्याचे आव्हान पंकजा यांनी पवारांना केले.पवार कुटुंबात सध्या लढाई सुरू आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. मोदींनी आमच्या विषयी बोलू नये. आमचा परिवार असा घट्ट असल्याचे पवार यांनी खडसावून सांगितले होते.वर्ध्याच्या सभेत पंतप्रधान म्हणतात शरद पवारांच्या परिवारात वाद सुरु आहे, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या मंत्री म्हणतात पवार परिवार घट्ट असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. त्यामुळे पवार कुटुंबाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आरोप खरा की पंकजा मुंडेंनी केलेली स्तुती खरी हा प्रश्नच आहे.
पवार कुटुंबियांच्या बचावासाठी खुद्द पंकजा मुंडेच ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 3:59 PM