बारामती - Ajit Pawar in Baramati ( Marathi News ) गेली अनेक वर्ष तुम्ही घड्याळाचं बटण दाबताय, तिथेच मतदान करा. आम्ही कुणी पक्ष चोरला नाही. एकनाथ शिंदेंनेही नाही आणि मीदेखील नाही. आज ८० टक्के लोक सोबत असल्याने निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे. काहीजण भावनिक करतात, पक्ष चोरला, चोरला, आम्ही चोरटे आहोत का? दरोडेखोर आहोत का? आम्ही काम करणारी माणसं आहोत अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं आहे.
अजित पवार म्हणाले की, माझ्यात अजून ५-१० वर्ष काम करण्याची धमक, ताकद आहे. तसं इतरांनी काय काम केले हे तुम्हाला माहिती आहे. अजूनही किती कार्यकर्त्यांची नावं त्यांना माहिती नाही. इतके दिवस माझी मोठ्या लोकांची ओळख नव्हती. मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. ९० साली मी राजकारण सुरू केले. ९० पासून गेल्या निवडणुकीपर्यंत बारामतीत अर्ज भरल्यानंतर शेवटच्या सभेसाठी यायचे. आता गावोगावी फिरतात, का मला विरोध करतात? मी इतके वर्ष साथ दिली नाही? कशात कमी पडलो? तुम्ही भावनिक होऊ नका ७ तारखेचे मतदान झाल्यावर यांच्यातील २-४ लोकांनी परदेश दौरा केला नाही तर नावाचा अजित पवार नाही असंही त्यांनी म्हटलं.
तसेच आता उगीच येतात, काही काही सांगतायेत, आम्ही टँकर देऊ, चारा देऊ, डेपो उभा करू असं सांगतायेत. ७ तारखेनंतर यातील कुणी येणार नाही. नंतर मीच आहे. महायुतीच आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसच मदत करणार आहे. आपत्कालीन परिस्थितीबाबत जी कमिटी आहे त्याचे प्रमुख अमित शाह आहे. कुठेही आपत्कालीन स्थिती आली तर केंद्र मदत करते. आम्ही कुणीही तुम्हाला पैसा कमी पडू देणार नाही. जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ बघा, सासूचे ४ दिवस संपले आणि सुनेचे ४ दिवस येऊ द्या, सुन बाहेरची असते का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. ४० वर्ष झाली तरी बाहेरची...आयाबहिणींनो सांगा. या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही मला ३०-३५ वर्ष खूप प्रेम दिलंय. तसेच प्रेम द्या असं आवाहन अजित पवारांनी केले.
दरम्यान, लोकसभेलाही मतदान करा, केंद्राचा निधी आणायचा आहे. ते आणल्याशिवाय कायमचे पाण्याचे दुखणं सुटणार नाही. हे लक्षात घ्या. कुठल्या बुथवर काय झाले सर्व कळते. लोकसभेत जे सरकार येणार आहे त्या विचारांचा खासदार निवडून दिल्यानंतर आपल्याला मतदारसंघातील कामे करायची आहेत. काहीजण म्हणाले खासदाराची पर्स कोण सांभाळणार, पर्स तीच सांभाळणार, मी काम करून आणेन. मागच्या अनेक खासदारांपेक्षा महायुतीच्या खासदाराची कारकिर्द उजवी असेल असा विश्वास तुम्हाला देतो असं अजित पवारांनी सांगितले.