सोलापूर - Abhijit Patil Support BJP ( Marathi News ) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा, सोलापूर मतदारसंघात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी नवी खेळी खेळली आहे. या खेळीनं महाविकास आघाडीला धक्का बसला असून त्याचा माढ्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरातील राम सातपुते या उमेदवारांना फायदा होणार आहे.
माढा, सोलापूरातील भाजपा उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या बैठकीत घेतला. नुकतेच अभिजीत पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आज कारखानाच्या सभासद, सहकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपा उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं अभिजीत पाटील यांनी म्हटलं.
तर अभिजीत पाटील यांची संस्था संकटात आहे. ती संस्था आपल्याला वाचवायची आहे. तिळगूळ घ्या गोड गोड बोला करूया असं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. त्याशिवाय अभिजीत पाटील यांनी मला आणि राम सातपुते यांना पाठिंबा दिला आहे. भाजपाच्या वतीने मी त्यांचे आणि त्यांच्या विठ्ठल परिवाराचे आभार मानण्यासाठी आलो आहे. आम्ही सहकारी साखर कारखान्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी लागणारी मदत करू असा शब्द अभिजीत पाटील यांना दिल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अभिजीत पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर-गुरसाळे या कारखान्याच्या ३ गोडाऊनला महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सिल केलं होतं.बँकांवर झालेल्या कारवाईमुळे अभिजीत पाटील चिंतेत होते, अशावेळी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीसांनी संकटातील कारखाना बाहेर काढण्यास मदत करू असा शब्द अभिजीत पाटलांना दिला. त्यानंतर आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.