"काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 02:01 PM2024-04-04T14:01:49+5:302024-04-04T14:04:20+5:30

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसने ५ गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली.

lok sabha election 2024 BJP Keshav Upadhye Slams Congress | "काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

"काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटावसारखी अनेक आश्वासने दिली. मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. अशा काँग्रेसने ५ गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"नक्कल करायलाही अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसकडे नाही हे मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाला दाखवून दिले. केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही, उलट देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या मोदी सरकारच्या पारड्यात प्रचंड बहुमताने सत्तेचे दान टाकेल. "
                                                                                                                                                                                          
"गेल्या दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्यानंतरही पुन्हा एकदा जनतेच्या फसवणुकीसाठी मोहब्बत की दुकान सारखे फसवे मुखवटे घालून काँग्रेसी नेते जनतेकडे मतांची याचना करीत आहेत.  पंतप्रधान मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली. ती पूर्ण करून दाखवली. गरीब, युवक, महिला, शेतकरी या चारच जाती देशात असून त्यांच्या विकासाकरिता भाजप कटिबद्ध असल्याची गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिली आहे."

"गरीबी हटाव नारा देणाऱ्या काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांची आणि पक्षाला वेठीस धरणाऱ्या गांधी घराण्याची गरीबी हटली, देश मात्र अधिकाधिक गरीब होत गेला. शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या नावाखाली बँकांच्या तिजोऱ्या भरून शेतकऱ्याच्या पदरात मात्र कर्जाचे ओझे कायमच ठेवण्याचा पराक्रम काँग्रेसी सत्ताधीशांनी केला" असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 
 
"पंतप्रधान मोदी केवळ गॅरंटीच्या घोषणा करत नाहीत, तर गेल्या दहा वर्षांत त्यांनी दिलेली  प्रत्येक गॅरंटी पूर्ण केल्याचे देशाने अनुभवले आहे. देशातील २५ कोटी लोकसंख्येच्या कपाळावरील दारिद्र्यरेषा मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे कायमची पुसली गेली असून जगाने याची दखल घेतली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेला प्रत्येक संकल्प पूर्ण झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. कलम ३७० रद्द करणे , राम मंदिर उभारणी , औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी,  महिलांचे सक्षमीकरण, अशा प्रत्येक क्षेत्रातील मोदी की गॅरंटी खरी ठरते हे लक्षात आल्यावर आता त्यांच्या गँरंटीची नक्कल करत न्याय आणि विकासाच्या कागदी घोषणा करून काँग्रेस पुन्हा देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहे."                                                                  

"काँग्रेसच्या प्रत्येक घोषणेतील पोकळपणा जनतेस माहीत आहे, याची जाणीव असूनही मोदी यांची नक्कल करताना काँग्रेसने आपली अक्कल एवढी गहाण टाकली, की मोदी मंदिरात गेले की यांचे नेते मंदिरांच्या पायऱ्या झिजवतात, मोदींनी गंगास्नान केले की यांचे नेते डुबकी मारतात, मोदी यांनी प्रचारयात्रा काढल्या की यांचे नेते देशात पदभ्रमणासाठी बाहेर पडतात. अशा नक्कल करण्याच्या हतबलपणामुळेच आता काँग्रेसने पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिल्या आहेत. अशा पाच पंचवीस फसवणुकांतून जनता यापूर्वीही गेलेली असल्याने, आता नक्कल देखील कामाला येणार नाही" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी खिल्ली उडवली आहे.
 

Web Title: lok sabha election 2024 BJP Keshav Upadhye Slams Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.