अभिनेता गोविंदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गोविंदा यांनी "गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात आणि गेल्या 10 वर्षांत देशात जे काही घडलं, ते यापूर्वी कधीही घडलं नव्हतं" असं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
जे चांगलं आहे आणि योग्य आहे त्यांचं नाव सर्वजण घेतील. जगभरात मोदींचं नाव घेतलं जात आहे. तुम्ही जर पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं नाही तर जग घेईल असं देखील गोविंदा यांनी म्हटलं आहे. गोविंदा यांनी पंतप्रधानांचं कौतुक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, अलीकडेही त्यांनी मोदींच्या कामाचं भरभरून कौतुक केलं होतं.
28 मार्च 2024 रोजी गोविंदा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे सदस्यत्व घेतल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मी आज या पक्षात प्रवेश करत आहे. 2009 मध्ये मी राजकारणातून बाहेर पडलो तेव्हा पुन्हा येईन असं वाटलं नव्हतं. पण आता मी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आलो आहे. माझा 14 वर्षांचा वनवास संपला आहे असं त्यावेळी गोविंदा यांनी म्हटलं होतं.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गोविंदा यांना लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हे आमचे मुख्यमंत्री ठरवतील. मला बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला आहे. पक्षात कला आणि संस्कृतीचं काम मिळालं तर मी नक्की करेन. मुंबई आता अधिक सुंदर झाली आहे असंही गोविंदा यांनी म्हटलं आहे.