नितीन गडकरींविरोधात काँग्रेसने दिला तगडा उमेदवार, चौथी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून आणखी चार उमेदवारांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:11 PM2024-03-23T23:11:48+5:302024-03-23T23:13:18+5:30
Congress 4rth Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी (lok sabha election 2024) काँग्रेसची उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमधून काँग्रेसचे एकूण ४६ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमधून काँग्रेसचे एकूण ४६ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश असून, पहिल्या टप्पात मतदान होणाऱ्या नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.
आज काँग्रेसने महाराष्ट्रामधील नागपूर, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये नागपूरमधून आमदार विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. तर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पाडोले यांना तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Congress releases the fourth list of 46 candidates for the upcoming Lok Sabha elections.
— ANI (@ANI) March 23, 2024
Congress leader Digvijay Singh to contest from Rajgarh Lok Sabha Constituency, UP Congress President Ajay Rai from Varanasi, Imran Masood from Saharanpur, Virender Rawat from Haridwar and… pic.twitter.com/wpnr6kvoUr
तत्पूर्वी काँग्रेसने महाष्ट्रातील सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात काँग्रेसने नंदूरबारमधून जी. के. पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, पुण्यामधून रवींद्र धंगेकर, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली होती. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अद्याप तोडगा निघालेला नाही. तसेच वंचितबाबतही मविआमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने आपल्या वाट्याला येणाऱ्या जागांवरील उमेदवार निश्चित करून आघाडी घेतली आहे.