Congress Ravindra Dhangekar News: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात तिरंगी लढत असणार आहे. भाजपाकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे निवडणूक रिंगणात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार, बैठका, मेळावे सुरू आहेत. यातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
देशासमोर अनेक प्रश्न आहेत. राहुल गांधी या प्रश्नांवर भाष्य करतील. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी जी वचने दिली होती, त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. देश आज हुकूमशाहीकडे चालला आहे, अशी सर्वांची भावना झाली आहे. देशातील अनेक घटक चिंता व्यक्त करत आहेत. न्यायालये, माध्यमे आणि इतर संस्थांमध्ये सरकारी हस्तक्षेप वाढला आहे. हीच परिस्थिती पुढे कायम राहिल्यास, देशासाठी ते योग्य होणार नाही, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही
आजवर महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांचे नाव आजही घेतले जाते. त्यांच्या कामाची उजळणी केली जाते. देवेंद्र फडणवीस ज्यादिवशी राजकारण सोडतील, त्यादिवशी नमस्कार करायलाही कुणी जाणार नाही. सत्ता असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार केले जात आहेत. सत्ता नसताना त्यांचे काय होते, हे बघा, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस कुणाचाही करेक्ट कार्यक्रम करू शकतात. अजित पवारांना प्रचंड त्रास दिला गेला, म्हणूनच ते एनडीएमध्ये गेले, असा मोठा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला. विधानसभा तसेच महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती संधी मिळते, ते आता पाहावे लागले, असा टोलाही रवींद्र धंगेकर यांनी लगावला.