मुंबई - Congress vs Uddhav Thackeray ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील प्रचारालाही सुरुवात झाली आहे. अशातच महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा वाढलेला आहे. सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात बिनसलं आहे. त्यातच ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारापासून काँग्रेस अलिप्त झाल्याचं समोर आलं आहे.
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या समन्वयात एकवाक्यता नसल्याचं पुढे आले आहे. काँग्रेस नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबतच्या तक्रारीही उद्धव ठाकरेंना प्राप्त झाल्या आहेत. प्रामुख्याने सांगली, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई येथे काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाली नाही. सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई या जागेसाठी काँग्रेस आक्रमक आहे. दिल्ली हायकमांडपर्यंत हा विषय पोहचला आहे.
मुंबईत ४ जागांवर ठाकरे गटाने उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात दक्षिण मध्य मुंबई जागेवर अनिल देसाईंना उमेदवारी मिळाली आहे. या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तर सांगलीत चंद्रहार पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. तिथेही काँग्रेस नेते नाराज असून त्यांनी प्रचारात सहभाग घेतला नाही. त्यामुळे काँग्रेस-ठाकरे गटाच्या वादाचा परिणाम प्रचारात दिसून येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत होतेय. पवारांनी काँग्रेसला आणखी एक जागा सोडावी असा सल्ला ठाकरे गटाला दिला आहे. मुंबईत उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांवर अद्याप उमेदवार घोषित केले नाहीत. या जागा मित्रपक्षाला सोडल्यात त्यांना जर लढायचं नसेल तर आम्ही येथून उमेदवार घोषित करू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. मात्र दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस ठाम आहे. त्यामुळे मविआतील तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.