गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडी स्थापन केली होती. मात्र लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना या आघाडीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र उभं राहिलं आहे. दरम्यान, या आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इंडिया आघाडीमध्ये काही ठिकाणी मतभेद असल्याचं विधान केलं आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र आल्याने मतभेद हे होणारच मात्र इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा सल्ला शरद पवार यांनी दिला.
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना इंडिया आघाडीतील घडामोडींबाबत शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र काम करावं असं वाटतं. मात्र यातील काही पक्ष हे त्या त्या राज्यांपुरते मर्यादित आहेत. अशा ठिकाणी त्या राज्यातील आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. ती प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी वादविवाद सुरू आहेत. उदाहणार्थ उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये जागावाटपाबाबत एकवाक्यता झालेली नाही. पश्चिम बंगालमध्येही अशीच परिस्थिती आहे. तिथे अडचणी अधिक आहेत. पश्चिम बंगालमध्ये आघाडीतील पक्षच एकमेकांचे विरोधी पक्ष आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध सीपीआय, तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस हे एकमेकांचे विरोधक आहेत. हे प्रश्न अद्याप आम्ही हाताळलेले नाहीत. अशा ठिकाणी आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून तोडगा काढला पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.
महाराष्ट्रातील जागावाटप आणि पक्षात पडलेल्या फुटीवरही शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, जागावाटपाबाबत आमच्या पक्षाकडून मी नाही तर जयंत पाटील हे चर्चेला असतात, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच काही लोक सोडून गेले त्याची चिंता करणार नाही. तर येत्या काळात राज्यभर दौरा करणार, असे संकेतही शरद पवार यांनी दिले.