अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून जागावाटपाबाबत काथ्याकूट सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हे प्रमुख पक्ष आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून १२ जागांची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान करताना महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करून सांगितला आहे. तसेच नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना महत्त्वाचं आवाहनही केलं आहे.
आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी वंचितकडून करण्यात आलेल्या १२ जागांच्या मागणीबाबत प्रश्न विचारला असता. संजय राऊत यांनी मविआतील जागावाटपाबाबतच्या फॉर्म्युल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, या चर्चा आम्ही वृत्तपत्रांमधून पाहतोय. जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होते. तेव्हा आम्ही त्यांनाही हे सांगितलं आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कुठलीही ओढाताण नाही. तसेच पुढेही ती होणार नाही. जागांचं वाटप हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरूनच होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात या भूमिकेबाबत एकमत आहे. तसेच याबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांचं एकमत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचीही त्याला मान्यता आहे, या सूत्रानुसारच आम्ही पुढे जात आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, वंचित बहुजन आघाडीला नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधात लढायचं आहे. नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले, तर हा देश हुकूमशाहीच्या खाईत ढकलला जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल, ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका हा देशासाठी फार मोठा मंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, या संविधानाचं महत्त्व त्यांना सर्वाधिक माहिती आहे.यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील भाजपाच्या सहभागावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणाले, देशाने स्वातंत्र्यालाठी दिडशे वर्षे संघर्ष केला. या दिडशे वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये हे लोक कुठेच नव्हते. मला आता कुणाची नावं घ्यायची नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.