माढा - Chandrakant Patil on Devendra Fadnavis ( Marathi News ) २०१९ मध्ये सरकार गेले, मी त्यावेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्यानंतर ३३ महिने आम्ही काय सहन केले हे आम्हाला माहिती आहेत. कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीसांना अटक होणार होती असा दावा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
माढा येथे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, फडणवीसांना अटक होणार होती, तेव्हा हे दिवस जातील असं आम्हाला वाटत होते, ते गेलेही, कुणाच्या ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असं त्यांनी म्हटलं.
चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कटकारस्थान होत होते, त्या लोकांनी प्रयत्न खूप केले. पण सापडत काही नव्हतं. खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टी केल्या. त्याबाबत सविस्तर पुन्हा कधी बोलू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आहे, माढ्याची कठीण नव्हती ती आता केली गेली असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होते. त्यावर माढ्याची लढाई काही अवघड नाही. माढ्याची लढाई ही भाजपा निश्चितपणे जिंकेल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
याआधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असा दावा केला होता, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या अटकेसाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत होते. त्या योजनेचा मी साक्षीदार आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं होतं. तर मविआ काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता. हे काम तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले गेले होते. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा. आत टाका असं वरिष्ठांनी पोलिसांना सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.