लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. काही मतदारसंघांमध्ये तिकिटाच्या आशेने नेत्यांचं पक्षांतर सुरू आहे. तर काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत संघर्ष होताना दिसत आहे. यातच आता अमरावतीची जागा भाजपा लढवणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी "रामटेकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहील आणि अमरावतीची जागा भाजपा लढवणार" असं म्हटलं आहे. यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान आता अमरावतीतील भाजपाच्या नेत्यांनी "काहीही करा, पण नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका" असं देवेंद्र फडणवीस यांना साकडं घातलं आहे.
अमरावतीमधील अख्खी भाजपा या क्षणी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील बंगल्यावर दाखल झाली आहे. "काहीही करा, पण नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका" असं सर्व नेत्यांनी फडणवीस यांना साकडं घातलं आहे. प्रवीण पोटे, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, किरण महल्ले, निवेदिता चौधरी, चेतन पवार, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर हे सर्वजण बंगल्यावर हजर असल्याची माहिती मिळत आहे.
महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी देखील आक्रमक भूमिका घेत आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याचं सांगत भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं आहे. बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा अहेर देत अमरावतीतून प्रहारचाही उमेदवार मैदानात उतरेल, अशी घोषणा केली आहे.
"मतदारसंघात आमची ताकद असतानाही आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. उलट महायुतीच्या संभाव्य उमेदवाराकडून आमच्याच कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे आम्ही या जागेवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला एक चांगला उमदेवार मिळाला असून ६ एप्रिल रोजी आम्ही या उमेदवाराची घोषणा करू. हा उमेदवार भाजपमधीलच आहे" असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.