मुंबई - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी त्यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता मस्क यांचा भारत दौरा रद्द झाल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात सत्ता बदलणार असल्याचा अंदाज आल्याने मस्क यांनी भारत दौरा लांबवणीवर टाकला, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केला आहे.
अनंत गाडगीळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, जगातील एक मोठे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहेत. म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे, याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. फक्त देशातल्या जनतेलाच नाही तर जगभरातल्या लोकांना मोदी पुन्हा येऊ शकत नाहीत हे कळून चुकले आहे, असे माजी आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.
अनंत गाडगीळ पुढे म्हणाले की, दुसऱ्या एखाद्या देशात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करण्यापूर्वी त्या देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करतात. काही कंपन्या तर सामाजिक परिस्थितीवरही लक्ष ठेवून असतात. या कंपन्यांच्या प्रमुखांच्या दौऱ्यांचे नियोजन कित्येक महिने अगोदरच केले जात असते. संबंधित देशात सत्तेवर कोणते सरकार असणार हा ही एक कंपन्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असतो. असे असताना टेस्ला या प्रसिध्द कंपनीचे मालक एलन मस्क यांनी भारत दौरा आता लांबणीवर टाकला आहे याचाच अर्थ भारतात निवडणुकांनतर सत्तापरिवर्तन होणार आहे याचा त्यांना अंदाज आला आहे. देशातल्या जनतेलाही हा अंदाज आलेला आहे. कितीही ४०० पारच्या गप्पा मारल्या तरी मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. मोदी आणि भाजपचा पराभव निश्चित झालेला आहे असे गाडगीळ म्हणाले.