काँग्रेस-भाजप-काँग्रेस असा प्रवास केलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बेधडक नेतृत्व आहे. स्वभावाने बंडखोर; वृत्ती लढाऊ, काँग्रेसमध्ये होते मग भाजपमध्ये गेले, पण तिथे रमले नाहीत, खासदार झाले, पण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशीच भिडले. खासदारकी सोडली; काँग्रेसमध्ये गेले. नागपुरात दिग्गज नितीन गडकरीविरुद्ध लढण्यास बडे बडे काँग्रेस नेते मागेपुढे पाहत असताना भंडारा-गोंदियाचे आपले क्षेत्र सोडून नानाभाऊ दंड थोपटून उभे राहिले. हरले पण आधीच्या निवडणुकीतील गडकरींचे मताधिक्य त्यांनी कमी केले. नानाभाऊ २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जिंकले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. मध्येच विधानसभा अध्यक्षपद सोडले. त्यांनी हे पद सोडले नसते तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले नसते, असेही म्हटले गेले.
लगेच नानाभाऊ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. एकमेकांना फटाके लावणे हा काँग्रेसमधील जुना रोग आहे आणि त्यावर अजूनही जालीम औषध सापडलेले नाही. नानाभाऊंनाही त्याचा त्रास झाला अन् होतोदेखील पण दिल्लीश्वरांच्या आणि विशेषतः राहुल गांधी यांच्या पाठबळामुळे त्यांचे कोणी काही वाकडे करू शकलेले नाही. त्यांना हटविण्याच्या हालचाली अनेकदा झाल्या, पण फायदा झाला नाही. काँग्रेसमध्ये त्यांच्या कार्यशैलीचे चाहते आणि या कार्यशैलीवर नाराज असलेले असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. एक नक्की की नानाभाऊ भाजप, मोदी-शाह, फडणवीसांना थेट भिडतात. टीका करायला मागेपुढे पाहत नाहीत. एखाद्या गोष्टीचा अभ्यास नसेल, मागचे-पुढचे संदर्भ माहिती नसतील तरी ती उणीव ते आक्रमक बॅटिंग करून भरून काढतात. मोदी-शाह-फडणवीसांना हेडऑन घेणारा नेता अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली, ती दिल्लीश्वरांपर्यंत व्यवस्थित पोहोचवली देखील.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे कान मोठे असावे लागतात. ते नानाभाऊंचे नाहीत; आजूबाजूची माणसे त्यांच्या कानात सांगतात आणि काड्या करतात, असा आक्षेप आहे. प्रदेश काँग्रेसच्या कारभारात दिल्लीश्वरांनी त्यांना खुली छूट दिली आहे. स्वपक्षाच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी नानाभाऊंचे फार चांगले ट्युनिंग नाही; पण काँग्रेसमध्ये हे आजचे नाही. पायओढेपणा हा या पक्षाला नेहमीच मारक राहिला आहे. काँग्रेसइतके अंतर्गत स्वातंत्र्य असलेला दूसरा पक्ष नाही. खरेतर अतिलोकशाहीने काँग्रेसचे मोठे नुकसान आज काँग्रेस एका निर्णायक झाले. वळणावर येऊन उभी आहे.
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवास्तव अधिक जागा दिल्या गेल्या असे म्हटले जाते, पण मित्रपक्षांना सांभाळून घ्या, असा दिल्लीचा निरोप असल्याने त्या लाइनवर पटोले चालले. शिवाय ते पूर्वीसारखे हट्टी, दुराग्रही राहिलेले नाहीत. रोज सकाळी एक संयमाची गोळी खातात. काँग्रेसला यावेळी चांगली संधी असल्याने त्यांनी स्वत:कडे अधिक जागा घ्यायला हव्या होत्या, अशी एक भावना असली तरी इतर दोन्ही मित्रांना काँग्रेसने सन्मानजनक जागा देताना खळखळ केली नाही. है औदार्य फायद्याचे ठरते की तोट्याचे, हे निकालावरून दिसेलच, आक्रमक नाना पटोले यांच्या नेतृत्वाची ही निवडणूक म्हणजे मोठी परीक्षा असेल. ४ जूनला लोकसभेचे निकाल लागतील. ५ जूनला नानाभाऊंचा वाढदिवस. आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल.