मुंबई : लोकसभेची निवडणूक १६ मार्चला जाहीर झाली आणि महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता शनिवारी झाली. प्रचाराच्या चौसष्टीत (६४ दिवसांमध्ये) अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भर उन्हात घाम गाळत प्रचाराचा धुराळा उडविला. आता जाहीर आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळाला असून २० मे रोजी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा असेल ती ४ जूनच्या निकालाची.
नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी महामुंबईतील १० आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने सांगता होईल. सूर्याने डोळे वटारलेले असताना नेत्यांनी मात्र मैदान गाजविले. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढतींचे चित्र बहुतेक मतदारसंघांमध्ये असले, तरी काही ठिकाणी तिहेरी लढतीही होत आहेत. केंद्र व राज्य सरकारचे विकासाचे दावे, त्यावर विरोधकांनी दिलेले प्रत्युत्तर, महागाई, बेरोजगारी, मुस्लिम आरक्षण, पंतप्रधानपदी कोण असावे, आदी मुद्यांभोवती प्रचार फिरला. उन्हाचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसला. टक्केवारी अचानक कशी वाढली, यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. अनेक मतदारांची नावे याद्यांमधून गायब असल्याचे आरोप झाले.
मोदींच्या झाल्या तब्बल १८ सभापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील एक रोड शोसह राज्यात १८ जाहीर सभा झाल्या. जवळपास अडीच लोकसभा तदारसंघामागे मोदींची एक सभा झाली.८ एप्रिलला त्यांची पहिली सभा झाली ती चंद्रपूरला आणि सांगता सभा १८ मे रोजी मुंबईत झाली.भाजप उमेदवारांबरोबरच मित्रपक्षांसाठीही त्यांनी सभांचा किल्ला लढविला. २०१९ मध्ये मोदींच्या १२ सभा राज्यातझाल्या होत्या.
देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या सर्वाधिक सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभांचे शतक पार केले.फडणवीस यांनी सर्वाधिक ११५, तर पटोले यांनी १०५ सभा घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ४८ सभा व ३७ रॅलीतून आक्रमक प्रचार केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ७, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२ सभा घेत विरोधकांवर टीकास्र सोडले. महायुतीला पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ४ सभा घेतल्या.
शरद पवार, उद्धव ठाकरेंनीही लावला धडाका- शरद पवार, उद्धव ठाकरे या दिग्गज नेत्यांनीही सभांचा धडाका लावला. तब्येतीच्या मर्यादा झुगारत पवारांच्या साठहून अधिक सभा झाल्या.- उद्धव ठाकरेंनी तीसहून अधिक सभांमधून महायुतीला टीकेचे लक्ष्य केले. - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या प्रत्येकी दोन सभांनी वातावरण ढवळून काढले.