मुंबई - Uddhav Thackeray on Muslim ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दादरच्या शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम समुदायातील लोकांसोबत संवाद साधला. यावेळी देशाचं संविधान वाचवण्यासाठी आधी जे झालं ते विसरा, आपल्याला एकत्र यायला हवं अशी साद उद्धव ठाकरेंनीमुस्लीम समाजाला घातली. माहिममधील मुस्लीम समुदायातील लोकांसोबत ठाकरेंनी बैठक घेतली.
या बैठकीनंतर बाहेर आलेल्या मुस्लीम समाजातील लोकांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंशी संवाद साधून चांगले वाटले. प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्याची भाषा त्यांनी केली. देशाचे संविधान वाचवण्याचं ते बोलले. कोणाविषयी त्यांनी वाईट म्हटलं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. आधी जे काही झालं ते विसरा, आज आपल्याला एकत्र यायला हवं. संविधानाला वाचवायचं आहे. यानंतर निवडणूक होईल की नाही अशी शंका उद्धव ठाकरेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं सांगितले.
तसेच जे देशासाठी चांगले आहे, त्यांना आम्ही साथ देऊ. आमचं कुणाशी शत्रुत्व नाही. पुढील काळात देशासाठी जे चांगले होणार आहे त्यासाठी आम्ही साथ देणार आहोत. उद्धव ठाकरेंनी चांगले काम केलेय. देशासाठी अनेकांनी बलिदान दिलंय म्हणून देशाला वाचवायचं आहे. उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. बटण कुणाचेही दाबा जिंकणार उद्धव ठाकरेच असंही या लोकांनी सांगितले.
दरम्यान, आज आपल्या देशातील लोकांसमोर अनेक समस्या आहेत. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी सर्वात चांगले काम केले. ते लोकप्रिय मुख्यमंत्री होते. तसेच एमआयएमच्या पतंगला धागा नाही. ती भाजपाची बी टीम आहे. द्वेषाशिवाय एमआयएम काम करत नाही. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात जनतेवर खूप उपकार केलेत. त्या उपकाराची परतफेड करण्याची ही वेळ आहे. आम्ही हे उपकार फेडू असंही याठिकाणी आलेले राहिद अन्सारी यांनी म्हटलं.
मुस्लीम समाजातील सुन्नी, शिया सर्व घटकांशी संवाद साधला. देशाचं वातावरण खराब झालं आहे. मी घरातील चूल पेटवणारा आहे. महागाई, बेरोजगारी, विकास यावर बोलतोय. जुन्या गोष्टी विसरून येणाऱ्या काळात एकसाथ संविधानाला वाचवू असंही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं लोकांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीचे आपले पुरोगामी विचारांचे उमेदवार आहेत अनिल देसाई यांना निवडून आणा असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं माहिमचे अकील अहमद शेख यांनी म्हटलं.
गेल्या २५ वर्षापासून आमच्या परिसरात शिवसेनेचा आमदार निवडून येतो. आम्ही पुरोगामी लोक आहोत. भाजपा काळात लोकशाहीला धोका आहे. खासगीकरण वाढत आहे. कामगार कायदे हटवण्यात आले आहे. केवळ अंबानी अदानींसाठी काम सुरू आहे. उद्धव ठाकरे हे पुरोगामी आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची धोरणं वेगळी आहेत - रिझवान कुरेशी, लेबर युनियन, उपाध्यक्ष