मुंबई - Rajshree Patil instead of Bhavna Gawli ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीतील जागावाटपाबाबत वर्षा बंगल्यावर सातत्याने बैठका होत आहेत. त्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु त्याठिकाणी भाजपाचा विरोध पाहता ही उमेदवारी बदलली जाईल अशी दाट शक्यता आहे. त्यातच यवतमाळ वाशिम मतदारसंघातून भावना गवळी यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. भावना गवळी यांच्याऐवजी राजश्री पाटील हे नाव आता पुढे आले आहे.
राजश्री पाटील हे हेमंत पाटील यांच्या पत्नी असून त्यांचे माहेर हे यवतमाळ आहे. त्यामुळे हिंगोलीतून जर उमेदवारी बदलली तर त्याजागी यवतमाळ मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात येईल असं बोललं जात आहे. परंतु अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही. दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे वर्षा बंगल्यावरून थोड्याच वेळात यवतमाळ वाशिम जागेबाबत अधिकृत उमेदवारी कुणाला मिळाली त्याचे नाव जाहीर केले जाईल.
राजश्री पाटील कोण आहेत?
हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलल्यानंतर त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जात आहे. राजश्री पाटील यांचे मूळ माहेर यवतमाळ आहे. त्यात राजश्री पाटील यांनी या मतदारसंघात सामाजिक कामातून नाव मिळवलं आहे. त्यामुळे त्यांचे नाव या मतदारसंघातून चर्चेला आले आहे. महिला उमेदवाराचा पत्ता कट केल्यानंतर महिलाच उमेदवार याठिकाणी द्यावी यातून राजश्री पाटील यांचे नाव पुढे आले आहे.
दरम्यान, हिंगोली मतदारसंघातून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्याजागी बाबुराव कोहाळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जाहीर केलेली उमेदवारी बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर आली आहे. वर्षा बंगल्यावर अजूनही खलबतं सुरू आहेत. भावना गवळी यांनी यवतमाळ वाशिममधील दावा सोडलेला नाही. परंतु चर्चेअंती आता हिंगोलीतून बाबुराव कोहाळीकर आणि यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील यांची नाव उमेदवार यादीत असण्याची दाट शक्यता आहे.