राज ठाकरेंशी युती करून भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार? काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 05:59 PM2024-03-19T17:59:58+5:302024-03-19T18:01:00+5:30
Congress Criticize BJP-MNS Alliance: उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे
मुंबई - भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, छट पुजेला विरोधी करणारे, उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या तसेच नेहमी उत्तर भारतीयांचा द्वेष करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला भारतीय जनता पक्ष निवडणुकीसाठी महायुतीत घेत आहे, हा तमाम हिंदी भाषकांचा अपमान आहे, त्यांच्याशी गद्दारी आहे. ‘अब की बार ४०० पार’ च्या वल्गणा करणाऱ्या भाजपाला ‘एरा गैरा नत्थू खैरा’, ज्या पक्षाकडे एखादा आमदार आहे त्यांना सोबत घेण्याची गरजच का पडावी? ज्या उत्तर भारतीयांना मनसेने मुंबईतून हुसकावून लावले त्यांच्या गृहराज्यात भाजपाला मते मागण्याचा अधिकार राहिलेला नाही. राज ठाकरेंच्या मनसेशी युती करण्याची वेळ भाजपावर आली याचाच अर्थ भाजपाने महाराष्ट्रात तरी लढाईच्या आधीच पराभव मान्य केल्यासारखे आहे.
बाँड जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडले, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष व चिन्हही चोरले, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाही फोडला, एवढे करूनही भाजपाला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक अवघड जात आहे हे दिसल्यानेच त्यांना ठाकरेंच्या विरोधात दुसरा ठाकरे उभा करावा लागतो एवढी नामुष्की भाजपावर आलेली आहे. भाजपा लोकसभा जिंकण्यासाठी काहीही करो परंतु त्यांचा पराभव अटळ आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.