खासदार धनंजय महाडिक यांनी "राहुल गांधी यांची जिथे जिथे यात्रा गेली तिथे काँग्रेस फुटली आहे. मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. संविधान कोणीही बदलू शकत नाही, हे मोदी यांनी सुद्धा सांगितलं आहे. मुद्दा नसल्याने विरोधक असे आरोप करत आहेत. संजय काका पाटील हे एकतर्फी निवडून येतील. महाविकास आघाडीमध्ये तिथल्या जागेवरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून येईल" असं म्हटलं आहे.
धनंजय महाडिक यांच्या विधानावर आता आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "काँग्रेसच्या जागा येणार नाहीत तर मग 5 टप्प्यात निवडणुका का लावल्या?" असा सवाल विचारला आहे. "मला माहीत नाही ते भाकीत कधीपासून सांगू लागले. ते भविष्य कधीपासून सांगू लागले हे मला माहीत नाही, असे असेल तर माझी कुंडलीपत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावे लागेल. काँग्रेसच्या जागा येणार नाहीत तर मग 5 टप्प्यात निवडणुका का लावल्या?"
"नेते मंडळी फोडायचं काम का करत आहेत? भाजपा अवसान आणण्याचा काम करत आहे त्यामध्ये तथ्य काहीही नाही" असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी शाहू महाराज यांच्या प्रचारावर देखील भाष्य केलं आहे. "इंडिया आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवात झाली आहे. संभाजी राजे छत्रपती यांचा तीन तालुक्यांचा दौरा पूर्ण होत आला आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यामध्ये शंका आहे."
"जे महायुतीमध्ये सामील झाले त्यांना सामील होताना बरं वाटलं होतं मात्र आता तिकिटासाठी मारामारी करावी लागत आहे. तिकिटासाठी ज्यांना पळापळ करावी लागत आहे त्यांच्या मागे जनता कशी राहणार? जे स्वतःचे तिकीट एका मिनिटात आणू शकत नाही ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार? शाहू महाराज हे जनतेचा आवाज आहेत, ते संसदेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवतील" असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.