शिवराज बिचेवार/ज्ञानेश्वर भालेनांदेड/परभणी : इंडिया आघाडीतील नेत्यांनी निवडणुकीअगोदरच आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळे काही जणांनी लोकसभेच्या रिंगणातून पळ काढत राज्यसभेच्या मार्गाने संसदेत प्रवेश केला आहे. देशातील जवळपास २५ टक्के जागांवर इंडिया आघाडी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. तेच एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करीत आहेत. ४ जूननंतर तर ते एकमेकांचे कपडे फाडतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या नांदेड, परभणी येथे शनिवारी सभा झाल्या. “सर्वांना माझा नमस्कार, २६ एप्रिलची तयारी झाली ना? असा सवाल करीत मोदींनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीशमहाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
शंकररावांकडून शिकण्याचा प्रयत्नपंतप्रधान मोदी यांनी माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची आठवण काढली. ते म्हणाले, मी राजकारणात नव्हतो, त्यावेळी पट्टपर्ती येथे सत्यसाईबाबा यांनी शंकरराव चव्हाण यांच्याशी माझी ओळख करून दिली. मला त्यांच्याशी बोलण्याचे सौभाग्य मिळाले. एवढ्या मोठ्या पदावर काम केलेल्या व्यक्तीतील नम्रता बघून मी प्रभावित झालो.
महादेव जानकर हे माझे लहान भाऊमतदाराला साद घालताना मोदी म्हणाले, तुमचे स्वप्न माझे संकल्प असून, परभणीसह मराठवाड्याचा विकास व्हावा, या उद्देशाने आगामी काळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. त्यात निश्चितच परभणीला न्याय मिळेल. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत, त्यांच्या पाठीशी मतदारांनी उभे राहावे.
मराठवाड्याच्या विकासात काँग्रेसने घातला खोडापरभणी येथील सभेत टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मराठवाड्याच्या विकासाच्या प्रक्रियेत काँग्रेसने सातत्याने खोडा घातल्यामुळेच मराठवाडा आजही मागासलेलाच राहिला. आम्ही मराठवाड्याला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी जलयुक्त शिवारसह वॉटर ग्रीडसारख्या काही महत्त्वपूर्ण योजना अमलात आणल्या होत्या; पण काँग्रेससह त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर पक्षांनी या योजना बंद करून मराठवाड्यावर एकप्रकारे अन्याय केला.
इंडिया आघाडीकडे चेहराच नाही. त्यामुळे हा देश कुणाच्या हातात देणार? जे आताच एकमेकांवर तुटून पडत असल्याचे दिसत आहेत. काँग्रेसच्या साहिबजाद्यांना तर वायनाडमध्येही संकट दिसत आहे. त्यामुळे ते सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. नुकतेच साहिबजाद्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलेच सुनावले. त्यांना परंपरागत अमेठीतून बाहेर पडावे लागले, वायनाड सोडावे लागले.