मुंबई - MNS on Uddhav Thackeray ( Marathi News ) महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर उबाठा गटाच्या नेत्यांनी राज ठाकरेंना टीकेचं लक्ष्य केले. सातत्याने भूमिका बदलणारे राज ठाकरे असा उल्लेख उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येतो. त्याला प्रत्युत्तर देत मनसे नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्यात मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक पत्र लिहून कधीही भूमिका न बदलण्यासाठी तुमचा दुधाने अभिषेक करण्यासाठी वेळ द्यावा असा टोला लगावला आहे.
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचा जसंच्या तसं...
प्रति,आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे, शिल्लक सेना प्रमुख (उबाठा), मुंबई.
विषय - कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळणेबाबत.
महोदय,सस्नेह जय महाराष्ट्र !!!
आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून (माफ करा आत्ताचा आपला उबाठा गट) कधीही सेनेच्या भूमिकेला छेद देऊन राजकारण केलेले नाही. मंत्रीपद, सत्ता, मुख्यमंत्री पद (स्वतःला) यासाठी आपण कधी भाजपा बरोबर युती केली तर कधी युती तोडली. नंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण सेनेचे पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णपणे विरोधी विचारधारा असलेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (म्हणजे आत्ताचा शरद पवार गट) बरोबर आघाडी केलीत मात्र सेनेला मुख्यमंत्री पद मिळवून दिलेच. हा भाग वेगळा की आपण एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतात पण माफ करा आम्ही विसरलोच की आपणही एक शिवसैनिकच आहात. हे सगळे आपण केलेत यास कुठेही यू टर्न, तडजोडीचे, सत्तापिपासू, स्वार्थी, मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे असे म्हणता येत नाही. याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे...!!!!
आपल्यासारखा इतका सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा आणि सत्तेचा अजिबात मोह नसलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय तर या पृथ्वीतलावर सापडणे दुर्मिळ. याच आपल्या गुणांसाठी, तुमचे महाराष्ट्रावर असलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्यावतीने आपला दुधाने अभिषेक करू इच्छितो (जसा नायक सिनेमात अनिल कपूरचा केला गेला होता) तरी आपण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना यासाठी आपली वेळ द्यावी, ही नम्र विनंती...!!!
आपला नम्र,गजानन काळे | महाराष्ट्र सैनिक
टीप - निवडणुकांच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण वेळ न देऊ शकल्यास आपल्या फोटोला आम्ही दुधाने अभिषेक घालून समस्त महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करुच..!!!
दरम्यान, राज्याच्या राजकारणात २०१९ पासून बऱ्याच उलथापालथी घडल्या. अनेक नेत्यांची पक्षांतरे पाहायला मिळाली. शिवसेना-राष्ट्रवादी यासारख्या पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर आता निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक पक्ष आणि त्यांचे नेते यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यात राज ठाकरेंनी २०१९ ला लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदी-शाहांवर टीका केली होती. त्याचे व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल करण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरेंनी शरद पवार, सोनिया गांधींवर केलेली टीका, त्याचसोबत मोदींचे केलेले कौतुक असे व्हिडिओही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.