नाशिक - भारत जोडो यात्रेदरम्यान चांदवड येथे शेतकरी मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृृत्वाखालील केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने मोदींनी दिली होती, पण १० वर्षात ती पूर्ण केली नाहीत. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन पटोले यांनी केले.
सभेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन असे आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती, पण १० वर्षात ती पूर्ण केली नाहीत, मोदींनी शेतकऱ्यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन पटोले यांनी केले.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मणिपूरपासून राहुल गांधी हे शेतकरी, तरुण, कामगार, महिला वर्गाला गॅरंटी देत आहेत. २००४ ते २०१४ या काळात युपीए सरकार जनतेचे, शेतकरी हिताचे निर्णय घेत होते परंतु मागील १० वर्षात केवळ मुठभर लोकांसाठी निर्णय घेतले जात आहेत. आज शेतकरी संकटात आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकारच जबाबदार असेही थोरात म्हणाले.
यावेळी शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, देशात आज शेतकरी समस्या, बेरोजगारी, महागाई, भागिदारी हे मुळे मुद्दे आहेत पण जनतेच्या या मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. पिक विमा योजनेचा फायदा केवळ कंपन्यांना होतो, शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना मदत मिळत नाही हे चित्र बदलण्याची गरज आहे, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पिक विमा योजनेची पुनर्रचना केली जाईल. आयात-निर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांवर जीएसटी लावलेला आहे त्याचा काँग्रेस सरकार विचार करुन शेततकऱ्यांना जीएसटीतून वगळण्याचा प्रयत्न करेल. मुठभर उद्योगपतींचे कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे व काँग्रेस सरकार ते करेल. सीमेवरील जवान व शेतकरी यांच्याशिवाय देश चालू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांचे आवाज ऐकणारे काँग्रेसचे सरकार असेल असे राहुल गांधी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, आज द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे. युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. सध्याच्या भाजपा सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.