NCP Sharad Pawar Third List Announced, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर गुढीपाडव्याला सुटला. संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआने २१-१०-१७च्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केले. २१ जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, १० जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट तर १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आज शरद पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली. "तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, शरदचंद्र पवार यांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया!", असे ट्विट करत यादी जाहीर करण्यात आली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली असली तरीही एकूण १० पैकी ९ जागांचीच नावे देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार हे अद्याप जाहीर केलेले नाही.
- अमर काळे - वर्धा
- भास्कर भगरे - दिंडोरी
- सुप्रिया सुळे - बारामती
- अमोल कोल्हे - शिरूर
- निलेश लंके - अहमदनगर
- बजरंग सोनवणे - बीड
- सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे - भिवंडी
- शशिकांत शिंदे - सातारा
- श्रीराम पाटील - रावेर
लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचे मतदान जसजसे जवळ आले त्यानुसार राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा कित्येक दिवसांपासून सुटत नव्हता. परंतु गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखेर संयुक्त पत्रकार परिषद घेत, महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉम्युला जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली. याअगोदर शरद पवार गटाकडून दोन याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यात वर्धा, दिंडोरी, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड आणि भिवंडी या जागांची नावे जाहीर झाली होती. तर सातारा, माढा आणि रावेर या जागांसाठी आज उमेदवारांची नावे जाहीर होणार होती. पण आज केवळ दोन जागांवरील नावेच जाहीर झाली. माढाच्या जागेवर अजूनही सस्पेन्स कायम आहे.