Lok Sabha Election 2024: जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतात आज(19 एप्रिल 2024) लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली. आज सकाळी 7 वाजेपासून लोकसभा निवडणुकच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून, 21 राज्यांमधील 102 मतदारसंघात मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, आज या पाच लोकसभा मतदारसंघातील विविध नेते आपल्या मतदानाचा हक्का बजवताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील आज नागपुरात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मोठ्या फरकाने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, "आज आपण देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा सण साजरा करत आहोत. मतदान हा प्रत्येकाचा मुलभूत हक्क आणि कर्तव्य आहे, त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे. गेल्या वेळी 54 टक्के मतदान झाले होते, यावेळी मतदानाची टक्केवारी 75 टक्क्यांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे. तुम्ही कोणालाही मत देऊ शकता पण मतदान करणे महत्त्वाचे आहे. मला 101% विश्वास आहे की, मोठ्या फरकाने जिंकेन."
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी कोराडी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मतदान केले.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पट्टेल यांनीदेखील आज गोंदियामधील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्का बजावला आहे.
पहिल्या टप्प्यात कुठे-कुठे मतदान?लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तामिळनाडू (39 जागा), उत्तराखंड (5 जागा), अरुणाचल प्रदेश (2 जागा), मेघालय (2 जागा), अंदमान आणि निकोबार (1 जागा), मिझोराम (1 जागा), नागालँड (1 जागा), पुदुचेरी (1 जागा), सिक्किम (1 जागा), लक्षद्वीप (1 जागा), राजस्थान (12 जागा), उत्तर प्रदेश (8 जागा), मध्य प्रदेश (6 जागा), आसाम (5 जागा), महाराष्ट्र (5 जागा), बिहार (4 जागा). पश्चिम बंगाल (3 जागा), मणिपूर (2 जागा), त्रिपुरा, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एखा जागेवर आज मतदान होत आहे.
पीएम मोदींचे आवाहन...
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आणि विशेषकरून तरुण मतदारांना अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून मतदानाला सुरुवात होत आहे. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील 102 जागांवर मतदान होत आहे. येथील मतदारांना मी अधिकाधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन करत आहे. तसेच तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी अधिकाधिक संख्येनं मतदान करावे. प्रत्येक मत महत्त्वपूर्ण आहे, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या आवाहनामध्ये म्हटले आहे.