केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील राजकारणाचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज घेणारे अनेक ओपिनियन पोल सध्या प्रसिद्ध होत आहेत. यापैकी बहुतांश ओपिनियन पोलमधून केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचं सरकार हे मोठ्या बहुमतासह सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्रात जनमताचा कौल कुठल्या बाजूने आहे, याचा वेगवेगळा अंदाज या कलचाचण्यांमधून वर्तवला जात आहे.
दरम्यान, आज दोन संस्थांचे ओपिनियन पोल प्रसिद्ध झाले असून, त्यामधून वेगवेगळे अंदाज समोर आले आहेत. यापैकी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रात अटीतटीची लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला २८ तर महाविकास आघाडीला २० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर झी न्यूज आणि मॅट्राइझ यांच्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रात महायुती धक्कादायक निकालाची नोंद करताना ४५ जागा जिंकेल, असा दावा करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ३ जागा मिळतील, अशी शक्यता या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली आहे.
या पोलचा सविस्तर आढावा घ्यायचा झाल्यास एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला ४२.७ तर महाविकास आघाडीला ४२.१ टक्के मतं मिळू शकतात. इतर पक्षांच्या खात्यामध्ये १५.१ टक्के मतं जाऊ शकतात. लोकसभेच्या ४८ जागांपैकी २८ जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये २२ जागा भाजपाला तर ६ जागा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीला २० जागा मिळू शकतात. त्यामध्ये काँग्रेसला केवळ ४ तर ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना १६ जागा मिळतील असा दावा या सर्व्हेमधून करण्यात आला आहे.
दुसरीकडे झी न्यूज आणि मॅट्राइझच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळू शकतं. महाराष्ट्रात महायुतीला तब्बल ४५ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला केवळ ३ जागा मिळतील असा दावा या सर्व्हेमधून करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीमध्ये भाजपाला २९, शिवसेना शिंदे गटाला १० आणि अजित पवार गटाला ६ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना प्रत्येकी १ जागा मिळेल, असा दावा या सर्व्हेमधून करण्यात आला आहे.