लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये अटीतटीची लढत झाल्याने येथील निकालाकडे सर्वाधिक लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना उद्देशून पत्र लिहून महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भूलथापांना बळी न पडता, लक्ष विचलित होऊ न देता मतमोजणी प्रक्रियेत सतर्क राहा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील लिहितात की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४' करिता आपण सगळ्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. मला आपल्या सगळ्यांचा अभिमान आहेच, परंतु ही लढाई इथेच संपलेली नाही. यासाठीच आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन करत आहे. तुम्ही सर्वांनी जी संयम आणि जी दक्षता विविध टप्प्यात पार पडलेल्या मतदानाच्या कालावधीत बाळगलीत, तोच संयम आणि तीच सतर्कता मतमोजणी संपेपर्यंत आणि विजयाचे प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंत आपल्या सगळ्यांना मिळून बाळगायची आहे. या कालावधीत सत्ताधारी पक्षाकडून दिशाभूल करून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होईल, परंतु आपण पूर्णपणे दक्ष राहायचे आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील पत्रात पुढे लिहितात की, देशातील लोकसभा निवडणूक मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. अशा स्थितीत सत्ताधा-यांनी हा एक्झिट पोलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे आपला स्वार्थ साधायला सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांना जवळपास ३०० जागांची आघाडी मिळणार असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचं काम मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही यंत्रणा करत आहेत. ही निव्वळ देशवासियांची फसवणूक असून, मतमोजणीच्या दोन दिवस अगोदर सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव खेळणं सुरू झालेलं आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
त्यात जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशात INDIA आघाडीलाच बहुमत मिळणार असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं असतानादेखील अशाप्रकारे सत्ताधारी दिशाभूल करत आहेत. कारण, तुम्हाला संभ्रमात टाकून तुमचा उत्साह कमी केला जाऊ शकतो. जेणेकरून तुम्ही दक्ष आणि सक्रिय नसाल आणि ही संधी साधून चंदीगढप्रमाणेच भ्रष्ट अधिकायांना हाताशी घेत मतमोजणीमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. मतमोजणीमध्ये सत्ताधारी घोटाळा करणार असल्याची कुठलीच शक्यता नाकारून चालणार नाही. त्यामुळे अशा कुठल्याही भूलथापांना वळी न पडता आपण मतमोजणीच्या दिवशी सतर्क राहणं अधिक गरजेचं आहे, असे जयंत पाटील म्हणाले.