मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) ज्यांना महाराष्ट्रानं गाडलंय अशा सगळ्यांचे आत्मे राज्यात गेल्या ४०० वर्षापासून भटकतायेत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे. हे आत्मे महाराष्ट्रात भटकत असले आणि त्यांच्याकडून काहीही वक्तव्ये होत असली तरी अशा भुताटकीच्या विधानांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्रात ढोंग, फेकाफेकी, अंधश्रद्धा याला कधीही महत्त्व दिले नाही असं सांगत संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर पलटवार केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हा पवित्र आत्मा यांचा प्रदेश आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. काल मोदी पुण्यात आले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी साधा उल्लेखही केला का? भाजपाला आंबेडकरांवर राग आहे. त्यांना आंबेडकरांचे संविधान बदलायचे आहे. म्हणून त्यांचे आत्मे महाराष्ट्रात भटकतायेत. त्यांना संविधान बदलायचं आहे. त्याविरोधात शिवसेना ठामपणे उभी आहे. मोदी काय म्हणतात याकडे फारसे लक्ष देऊ नका असं त्यांनी सांगितले.
तसेच उद्या १ मे आहेत, उद्या १०५ आत्मे, ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, ते मोदींना श्राप देणार आहेत. मोदींनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांचं जेवढं नुकसान केले तेवढे आतापर्यंत कुणी केले नसेल. त्यामुळे अतृप्त आत्म्याविरोधात महाराष्ट्राची लढाई आहे. उद्या १ मे महाराष्ट्र दिन आहे. आम्ही सगळे १०५ हुताम्यांना आदरांजली वाहू आणि त्यांना सांगू महाराष्ट्रविरोधी जे आत्मे भटकतायेत त्यांचा बदला आम्ही घेऊ असंही संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, तुमच्यासारखा एक भटकता आत्मा पंतप्रधानपदी बसला तर देशाचं स्मशान होऊन जाईल. आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे पंतप्रधानपदासाठी आहेत. हे लोकशाहीसाठी उत्तम उदाहरण आहे. उत्तम चेहरे आहेत. आम्ही भाजपाप्रमाणे पंतप्रधान लादणार नाही. लोक स्वीकारतील तो चेहरा होईल असं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.