यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महायुतीत खटके उडणे सुरूच आहे, महाविकास आघाडीतही तणाव आहे. मुंबईतच काही ठरत नसल्याने दिल्लीचा अंतिम फैसलाही अडला आहे. माढामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होऊनही भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध सुरूच ठेवला आहे. बारामतीत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (शिवसेना) आणि हर्षवर्धन पाटील (भाजप) हे सुनेत्रा पवार यांना विरोध करण्याची चिन्हे असल्याने अजित पवारांचा ताप वाढला आहे.
काँग्रेससाठी चंद्रपूरची उमेदवारी ही डोकेदुखी बनली आहे. विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर असा पेच तेथे आहे. दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचे (शिंदे) राहुल शेवाळे उमेदवार असतील आणि त्यांना टक्कर द्यायची तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवा, असा काँग्रेसचा आग्रह आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तिथे अनिल देसाईंच्या नावावर अडली आहे.
- महायुतीत यावर मतभेद
- नाशिकची जागा शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीलाही हवी.- रामटेक, कोल्हापूर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गवरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच.- धाराशिव, गडचिरोली, सातारावर भाजप अन् राष्ट्रवादीचाही दावा
- मविआची चिंता
- रामटेक, दक्षिण-मध्य मुंबई, सांगली हे काँग्रेस व शिवसेनेला हवेत.- भिवंडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही दावा - जालनाच्या जागेसाठी शिवसेनेबरोबर काँग्रेसही आग्रही- मुंबईत काँग्रेसला किमान दोन जागा हव्यात.
- ‘या’ जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली
- अमरावतीत नवनीत राणांना उमेदवारी देण्यास स्थानिक बहुतेक सर्व भाजप नेत्यांचा विरोध- माढामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीस रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी) आणि विजयसिंह मोहिते पाटील (भाजप) यांचा विरोध.- सोलापूरचा उमेदवार ठरविण्यात स्थानिक नेत्यांमध्ये मतैक्य नाही.- सातारामध्ये उदयनराजे यांना उमेदवारी देण्याबाबत मतदारसंघातील काही भाजप नेत्यांची नाराजी.
यवतमाळ-वाशिम, रामटेकसाठी दबावयवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी यांना विरोध करण्यासाठी भाजपचे दोन्ही जिल्ह्यातील नेते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जोर लावत आहेत. रामटेकची जागा आपल्याकडे घ्या, असा दबाव स्थानिक भाजप नेत्यांनी फडणवीसांवर आणला आहे.
वंचितची शक्यता किंचित; चर्चा सुरूचॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे. अजूनही आंबेडकर यांच्याशी अन्य तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करत आहेत. आंबेडकर रोज नवनव्या मागण्या करत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा सफल होण्यात अडचणी येत आहेत, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.