नेत्यांच्या सभांचा धुरळा, उमेदवारांची दमछाक; उरले केवळ दोन दिवस, लोकसभेचे काउंटडाऊन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 08:35 AM2024-04-23T08:35:41+5:302024-04-23T08:37:15+5:30
नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ४ जूनलाच खरे काय ते समजणार आहे.
वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आता जाहीर प्रचारासाठी मंगळवार आणि बुधवार हे दोनच दिवस उरले आहेत. बुधवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावणार असल्याने उमेदवारांची जनसंपर्कासाठी धावपळ सुरू आहे.
धाकधूक वाढली, काय होणार?
मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नेत्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघून विजय, पराजयाचे दावे केले जात आहे. मतदार केवळ नेत्यांचे भाषण ऐकण्यात दंग आहेत. त्यांनी अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यामुळे नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ४ जूनलाच खरे काय ते समजणार आहे.
जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत
आठही लोकसभा मतदारसंघांमध्ये नेत्यांच्या सभांचा धुरळा उडत आहे. दररोज कुठे ना कुठे सभा होत आहेत. त्यामुळे खुद्द उमेदवारांचीही दमछाक होताना दिसून येत आहे. बुधवारी सायंकाळी प्रचार थांबल्यानंतर मूक प्रचाराला सुरुवात होईल. तत्पूर्वी विविध नेत्यांना आपल्या मतदारसंघात आणून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करताना उमेदवार दिसून येत आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना मतदारसंघात पाचारण केले जात आहे. एक सभा होण्यापूर्वीच उमेदवारांना दुसऱ्या नेत्यांच्या सभेला धावपळ करत पोहोचावे लागत आहे.