जळगाव - अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. उद्धव ठाकरेंसोबतचे ४० आमदार रातोरात बाजूला झाले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात या आमदारांनी ठाकरेंविरोधातच बंड केले. त्यातून सूरत, गुवाहाटी, गोवा प्रवास करून ते महाराष्ट्रात परतले. राजकारणातील या घडामोडींबाबत अनेक किस्से सांगितले जातात. त्यातच शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी मी अॅम्ब्युलन्सनं गेलो होते असा आणखी एक किस्सा सांगितला.
जळगावच्या कार्यकर्ता मेळाव्यात गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना-भाजपा निवडणूक जिंकली, त्यानंतर कुणी सत्ता बदलायला लावली हे सांगायला मी उभा नाही. पक्षाचा नेता आदेश देतो, त्याप्रमाणे आमदारांनी काम करायचे असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं, आपण आपल्या विचारांपासून लांब जातोय तेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंना थांबवण्याचा प्रयत्न केला. लोक म्हणतात, हे फुटले, फुटले नाही तर यांच्यासमोर गेलो. संजय राऊतांसमोरून गुलाबराव पाटील गेला. जे आमदार गेलेत त्यांना परत बोलवा असं मी सांगितले. पण त्यावेळी या लोकांनी आम्हाला हिणवलं त्यामुळे आम्ही २० आमदार गायब झालो असं त्यांनी म्हटलं.
तसेच मला घ्यायला गिरीश महाजन आले, मंगेश चव्हाण सफाई कामगाराचा ड्रेस घालून आले. माझ्या बंगल्यावर कोण आलंय पाहिले, मी कशाने गेलो तर अॅम्ब्युलन्सनं गेलो. ३३ नंबरवर मी गेलो. जे मला गद्दार म्हणतायेत, तेव्हा आम्ही वेट अँन्ड वॉच केले. झालेली चूक दुरुस्ती करू शकतो, आपण पुन्हा आपल्या वळणावर येऊ शकतो. म्हणून मी पहिल्या लाईनमध्ये गेलो नाही. ३३ नंबरवर मी गेलो असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आपलं सरकार आलं, या अडीच वर्षात सरकारी गती आणि प्रगती आपण पाहतोय. ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिले जाते. इथे जातपात बघितली जात नाही. निवडणूक आल्यावर मुस्लीम धोक्यात आहे असं काँग्रेसवाले सांगतात. आपण जी कामे केलीत ती लोकांपर्यंत सांगा. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-मनसे-आरपीआय एकजुटीनं प्रचार करायचा आहे. आपली ताकद दाखवून द्यायची आहे असं आवाहन गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना केले.