यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, नरेंद्र मोदींचा प्रचार करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी मोदींची बाजू घेऊन भगव्या वस्त्राचा अपमान केलाय. योगी यांनी भगवे कपडे घालून संतांचे विचार मांडावेत, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे.
नरेंद्र मोदी, भाजपा आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत काय केलं? दहा वर्षांत काय केलं ते त्यांनी सांगितलं पाहिजे. गरीबांना तांदूळ दिला, त्यातही चीनमधील प्लॅस्टिकचा तांदूळ आणून मिसळून दिला. चीनने आपल्या देशाच्या सीमांवर कब्जा केला, त्यावर नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. योगी आदित्यनाथ यांनी भगवे कपडे घातले आहेत. मग संतांसारखे विचार मांडा. पण ज्यांनी देशाला विकलं, अशा नरेंद्र मोदींबाबत योगी आदित्यनाथ हे गुणगान गात असतील, तर ते एकप्रकारे भगव्या वस्त्राचाही ते अपमान करत आहेत, असं आमचं मत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याखालोखाल योगी आदित्यनाथ यांच्या सभांना मागणी असल्याचे दिसून आले होते. महाराष्ट्रामध्ये ही अनेक मतदारसंघात भाजपाकडून योगी आदित्यनाथ यांना प्रचारासाठी निमंत्रित करण्यात आले होते.