मुंबई - Mahavikas Aghadi Seat Sharing Controversy ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्यात महाविकास आघाडीतील तिढा आणखी गुंतागुंतीचा होत चालला आहे. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागेवरून काँग्रेसचं शरद पवार आणि ठाकरे गटाशी बिनसलं आहे. चर्चेतूनही यावर मार्ग निघाला नाही. त्यामुळे अखेर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीकडे म्हणणं मांडलं आहे. त्यामुळे दिल्ली हायकमांडच्या निर्णयाकडे काँग्रेस नेत्यांचे लक्ष आहे.
सांगलीची जागा काँग्रेसला हवी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेस नेतेही त्यासाठी आग्रही आहेत. परंतु या जागेवर उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने मविआत नाराजी पसरली. काँग्रेस नेत्यांनी उघडपणे यावर भाष्य करत ठाकरेंना आघाडी धर्म पाळण्याची आठवण करून दिली. परंतु उद्धव ठाकरे ऐकण्यास तयार नाहीत. सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असून ती मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. त्यामुळे काँग्रेस नेतेही आक्रमक झालेत. त्यातच भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती तिथेही शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज काँग्रेस नेत्यांकडून आता दिल्लीकडे सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अहवाल पाठवला आहे. त्यावर दिल्ली हायकमांड काय निर्णय देते यावर राज्यातील महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.
मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई या जागेवर काँग्रेसनं लढण्याची तयारी केली होती. इथं मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी होती. परंतु या जागेवर ठाकरेंनी अनिल देसाईंची उमेदवारी जाहीर केली. मुंबईतल्या ६ पैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलेत. त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागेवर अद्यापही उमेदवार घोषित नाहीत. परंतु जर मित्रपक्षाला या जागा लढायच्या नसतील तर तिथेही आम्ही उमेदवार घोषित करू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी होतेय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, कोकण पट्ट्यातील मुंबईतील २ जागा वगळता एकही जागा काँग्रेसला सोडण्यात आली नाही. कोकणातील ठाणे, कल्याण, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या सर्व मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे उमेदवार असतील तर भिवंडी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. आता काँग्रेसकडे केवळ उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई याच जागा आहेत. त्यामुळे काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.