मविआमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ, पण जागा किती मिळणार? समोर येतोय असा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 04:58 PM2024-01-09T16:58:43+5:302024-01-09T16:59:29+5:30
Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपासह महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपासह महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधीलकाँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कोण किती जागांवर लढेल याबाबतचा अंतिम निर्णय हा महाराष्ट्राबाबत इंडिया आघाडीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये होणार आहे.
महाराष्ट्रातील आघाडीबाबत दिल्लीत काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड हे बैठकीत सहभागी होणार आहेत. दरम्यान, सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची मोठी बैठक होणार आहे, त्यामध्ये जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. १४ आणि १५ जानेवारीदरम्यान, ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होऊ शकतात. त्यात जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.
दरम्यान, या बैठकीपूर्वी सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटच मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकसभेच्या एकून ४८ जागांपैकी १५ जागा ठाकरे गटाला, तर काँग्रेस आणि शरद पवार गटाला प्रत्येकी १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जागा मित्र पक्षांना मिळू शकतात. मात्र जागावाटपाच्या चर्चेत कांग्रेस २२, ठाकरे गट २३ आणि शरद पवार गट २० जागांवर दावेदारी करू शकतात.
महाराष्ट्रातील जागाटपाबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जागावाटपाबत दिल्लीत बैठक बोलवाण्यात आली आहे. कोण कुठून लढेल याबबत त्यात चर्चा होईल. एक दोन जागांवर वाद होऊ शकतो. त्यावर चर्चा करू शकतो.