मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा अखेर सुटला आहे. जागावाटपांसंदर्भात केल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. सातारा, माढा आणि रावेर या जागांसाठी आज उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याचे समजते.
आज दुपारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. याअगोदर शरद पवार गटाकडून दोन याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी, तसेच मुंबईतील काही लोकसभेच्या जागांवरुन वाद सुरू होता. परंतु महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला २१, काँग्रेसला १७ आणि राष्ट्रवादी १० जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला,अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया ,गडचिरोली चिमूर,चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर , रामटेक, उत्तर मुंबई अशा १७ जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. यापूर्वी कॉंग्रेसने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत. तसेच, आज तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली. तर वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे आणि अहमदनगरमधून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच, दुसऱ्या यादीमध्ये बीडमधून बजरंग सोनावणे आणि भिवंडीमधून बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, सातारा, रावेर, माढा या मतदारसंघाबाबत अजून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता या जागांसाठी शरद पवार कुणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.