सासवड - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात बंड पुकारणाऱ्या शिंदे सेनेचे पुरंदरचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. शिवतारे म्हणाले, २६ मार्चला मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा मला फोन आला. माझ्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री आणि महायुतीमध्ये अडचण होत आहे. प्रत्येक मतदारसंघात असे अपक्ष उमेदवार उभे राहिले तर १५ ते २० जागा धोक्यात येतील, असे खतगावकर म्हणाले. गुंजवणी धरणाचे पाणी पुरंदरला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर कामाचे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती शिवतारे यांनी सासवड येथे दिली.
माध्यमांना माहिती नसते तेव्हा आम्ही भूकंप घडवतो...मुंबई - प्रसिद्धिमाध्यमांना माहिती नसते तेव्हा आम्ही भूकंप घडवून आणतो, आज मीडिया म्हणतोय की भूकंप होणार, म्हणजे समजा की तसे काही होणार नाही, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप प्रदेश कार्यालयात फडणवीस म्हणाले की, अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत, ते भाजपमध्ये येणार का, असे प्रश्न विचारुन कशाला संशय निर्माण करता. अमित देशमुखांबाबतही असे आमच्या बाजूने काहीही नाही. महायुतीची चर्चा चार-पाच जागांवर अडली आहे, हे फडणवीस यांनी मान्य केले. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना चाकूरकर व उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.