लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. जागावाटबाबत महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात एकमत होत नाही आहे. त्यातच आता महायुतीमधील लहान पक्षांनीही आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. महायुतीच्या जागावाटपामध्ये आम्हालाही विश्वासात घ्या अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ असा इशारा, बच्चू कडू यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत बच्चू कडू म्हणाले की, जसे समोरचे येतील तशी आम्ही समोर पावलं टाकू. आमची कुणाशी बोलणी झालेली नाही. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहोत. मात्र आता याबाबत भाजपानं पुढाकार घ्यावा. नाही घेतला तरी आमची काही हरकत नाही. आमची त्यांना विनंतीही नाही आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा. सोबत घ्यायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. एक पाऊल त्यांनी समोर टाकावं, आम्ही दहा पावलं टाकू. बाजूनं टाकलं तर त्यांच्या बाजूनं टाकू. विरोधात टाकलं तर विरोधात टाकू, असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला.
दरम्यान, महायुतीमधील जागावाटपाबाबत अद्याप कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही. मिळत असलेल्या माहितीनुसार राज्यात भाजपा ३२ ते ३६ जागांवर लढण्याची तयारी करत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वाट्याला फारशा जागा येण्याची शक्यता नाही आहे.