- प्रगती जाधव-पाटील (वार्ताहर/ उपसंपादक, लोकमत, सातारा)आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवार लग्नाला आले तर तो आचारसंहितेचा भंग होतो का?- राजेश शिखरे, बुलढाणानिवडणुकांचे पडघम वाजू लागले की, सर्वत्र त्याची लगबग अनुभवायला मिळते. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेते आणि त्यांचे कार्यकर्ते वाट्टेल ते करायला तयार असतात. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्याला कसे पाेहोचता येईल, त्यांच्या संपर्कात कसे राहाता येईल, त्यांना आपलेसे कसे करता येईल आणि त्या माध्यमातून मतांची बेगमी कशी करता येईल, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.
वर्षभर कोणाच्या दृष्टीस न पडलेले कार्यकर्तही नेत्यांचे प्रतिनिधी म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये आघाडी घेऊन पुढे जात असल्याचे पाहायला मिळते. निवडणूक कालावधीत एखाद्याच्या घरी कोणाचा मृत्यू झाला, तरीही त्याच्याकडे जाऊन सांत्वन भेटीचा अलीकडे नवा प्रघात आहे. लोकांच्या दु:खद क्षणात त्यांचे सांत्वन करण्यासाठी जाणारे नेते लग्न, बारसे, मुंज अशा कार्यक्रमालाही हजेरी लावण्यासाठी सज्ज असतात. काही लग्नांच्या तारखा अगदी दोन - चार महिने आधीच ठरलेल्या असतात. स्थानिक संपर्काचा भाग म्हणून काहींनी तर नेत्यांच्या उपलब्धतेवरही लग्नाचा मुहूर्त ठरविलेला असतो.
अशावेळी निवडणुका लागल्या तर या नेत्यांना बोलवायचे का? त्यांच्या येण्याने आपल्यावर एखादा गुन्हा तर दाखल होणार नाही, ही भीती सर्वसामान्यांना निश्चित असते. नेत्यांना नाही बोलावलं तर ते दुखावणार आणि बोलावलं तर गुन्हा दाखल होणार, असे भन्नाट द्वंद्व लगीनघरात सुरू असते.
यासंदर्भात कायदा आणि नियम नेमके काय सांगतात? - निवडणुकीच्या कालावधीत नेत्यांचे असे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नाही. पण, अशा कार्यक्रमांमध्ये जाऊन नेत्यांनी भाषण केले आणि त्यातून मतदारांना काही आमिष दाखवले तर तो मात्र आचारसंहितेचा भंग होतो. घरगुती मंगल कार्यात सहभागी होणाऱ्या उमेदवाराने आपल्या पक्षाचा किंवा निवडणूक चिन्हाचा प्रचार करणे, उपस्थितांना आमिष दाखवणे किंवा राजकीय वक्तव्य करणे, हा आचारसंहितेचा भंग असतो. पण, उमेदवाराने अशा कार्यक्रमात येऊन शुभेच्छा देणे, हा आचारसंहिता भंगाचा प्रकार होत नाही. (सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)