काेल्हापूर : सांगली जिल्ह्याचे राजकारण आजदेखील दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्या नावाभाेवती पिंगा घालत असते. महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळणारे वसंतदादा पाटील यांच्या घराण्याची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली हाेती. सांगलीतून अपक्ष लढणाऱ्या त्यांच्या नातवाच्या रूपाने घराण्यात सहावा खासदार झाला.
सांगली लाेकसभा मतदारसंघाच्या दाेन पाेटनिवडणुकांसह १९ निवडणुका झाल्या. त्यापैकी १९५७ ची शेकापने जिंकली. २०१४ आणि २०१९ची भाजपचे संजय पाटील यांनी जिंकली. उर्वरित १६ निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्यापैकी पाच निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या सहकाऱ्यांनी जिंकल्या. १९८० मध्ये स्वत: वसंतदादा पाटील यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढविली. त्यानंतर सलग दहा निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील सदस्यांनी लढविल्या आणि जिंकल्या. २०१४ मध्ये पहिला आणि २०१९ दुसरा पराभव झाला. काल पुन्हा एकदा अपक्ष म्हणून विशाल प्रकाशबापू पाटील यांनी भाजपचे संजय पाटील यांचा पराभव करीत निवडणूक जिंकली.
प्रतीक प्रकाशबापू पाटील यांचा २००९ मध्ये विजय झाल्यावर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी वर्णी लागली हाेती. सांगली जिल्ह्यातील पहिलेच केंद्रीय मंत्रिपद हाेते. त्यांचा २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला. तत्पूर्वी १९९९ मध्ये काँग्रेसचे प्रकाशबापू पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे मदन पाटील यांच्यात लढत हाेऊन मदन पाटील यांचा पराभव झाला हाेता. २०१९ मध्ये विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. या निवडणुकीतही महाआघाडीतून काॅंग्रेसला उमेदवारी मिळाली नाही. विशाल पाटील यांनी बंड करून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी हॅटट्रिकच्या तयारीत असणारे भाजपचे संजय पाटील यांचा पराभव केला.
सहावा विशाल वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील खालील सदस्यांनी निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या (कंसात निवडणूक वर्ष) | वसंतदादा पाटील (१९८०) | शालिनीताई पाटील (१९८३ पाेटनिवडणूक) | प्रकाशबापू पाटील (१९८४, १९८९, १९९१, १९९९, २००४) | मदन पाटील (१९९६, १९९८) | प्रतीक पाटील (२००५ पाेटनिवडणूक, २००९) nविशाल पाटील (२०२४)