Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी सभांचा धडाका सुरू केला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचारसभा सुरू आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून डॉ.अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजी आढळराव पाटील यांच्यात लढत सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर अभिनयावरुन टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर आता डॉ. कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
'शिरुर लोकसभा मतदारसंघातील कामांसाठी ५ वर्षे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याची माहिती डॉ.अमोल कोल्हे यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
"मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावायची असतील तर अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणे हे अवघड आहे. यामुळे प्राधान्य ठरवावे लागेल. मला मतदारसंघातील प्रोजेक्ट महत्वाचे आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातील लोकांची काम महत्वाची आहेत, यासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला तरी घेईन. मी ही रजा पाच वर्षांसाठी घेणार आहे, असं डॉ.अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. या पाच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार पोहोचवणे हा अपवाद सोडला तर बाकी कुठेही तुम्ही मला स्क्रिनवर पाहाल असं मला वाटत नाही, असंही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.