मुंबई - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) उद्धव ठाकरे कोत्या मनोवृत्तीचे, उबाठानं काँग्रेससोबत लोटांगण घातलं. ते लीन झालेत आणि विलीनकरण बाकी आहे. झोपता उठता, शिव्याश्राप देणारे त्यांच्यासोबत जाणार ही चर्चा निरर्थक आहे असं सांगत एकनाथ शिंदेंनीउद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, भगवा झेंडा बाळासाहेबांना जीव की प्राण होता, आज त्याच भगव्याशी प्रतारणा उद्धव ठाकरे करतायेत. भगव्याची एलर्जी त्यांना दिसते, हिंदुत्व सोडले आहे. श्रीकांतवरील एवढ्या खालच्या पातळीवरील टीका ऐकून खंत वाटते. परंतु समोरून अपेक्षा काय करणार? जे बाळासाहेब ठाकरेंना विसरले. त्यांचे विचार सोडले. उद्धव ठाकरेंचे संतुलन बिघडले आहे. लोकांसोबत २ वेळा विश्वासघात केलाय. जनतेसोबत, युतीसोबत आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत विश्वासघात केलाय. फक्त खुर्चीसाठी महाबेईमानी त्यांनी केली असा आरोप त्यांनी केला. झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच मी संपूर्ण राज्यात फिरलो, काही मूठभर लोकांना मोदींबाबत एलर्जी आणि द्वेष आहेत. मोदी गेलेच पाहिजे असं त्यांचे म्हणणं आहे. परंतु मूठभर लोकांनी म्हणून काय होते, जनता मोदींसोबत आहेत. मौत का सौदागर, चौकीदार चोर है असे विविध आरोप विरोधकांनी याआधीही केले. आता तडीपार करणार, गाडून टाकणार अशी भाषा वापरली जाते. लाखो जनता आज मोदींसोबत आहेत. जेवढे विरोध करतात तेवढे लोक मोदींना मत करण्यासाठी पुढे येतात असा टोलाही एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, मराठीचा सन्मान राखलाच पाहिजे, त्यासाठी तडजोड होणार नाही. सरकार म्हणून काम करताना या राज्यातील प्रत्येकाला हे सरकार माझे आहे, त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे. उद्योजक असो वा शेतकरी, कामगार. मागील काळात उद्योजकांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवायला लागले ते कसे सुरक्षित राहणार? मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करायच्या असतील तर उद्योग धंदे आले पाहिजेत. त्यासाठी हे सरकार काम करतंय. वेदांता गेला, तेव्हा आमच्या सरकारला २ महिनेच झाले होते. २ महिन्यात उद्योग जात नाही. आधीच्या सरकारने स्वार्थासाठी अनेक गोष्टीची मागणी केली त्यामुळे ते गेले. आता महाराष्ट्रात ५ लाख कोटींची गुंतवणूक झालीय, एफडीएमध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे. आम्ही उद्योग राज्यात येण्यासाठी सुलभ प्रक्रिया सुरू केलीय. सिंगल विंडो सिस्टम, इन्फ्रास्ट्रक्चर, सोयीसुविधा देतोय असं सांगत शिंदेंनी आधीच्या सरकारवर भाष्य केले.
राज ठाकरे-आनंद दिघेंचे संबंध चांगले, त्यामुळे....
राज ठाकरे काम करणारा माणूस, आनंद दिघे काम करणारा माणूस, दिघेसाहेब राज ठाकरेंच्या कामाचं कौतुक करायचे. कधी कधी त्यांची बाजू लावून धरायचे. त्यामुळे बऱ्याचदा मानसिक त्रास आनंद दिघेंना या लोकांनी दिला. नेतृत्वावर विश्वास नसेल तर अशाप्रकारे गोष्टी केल्या जातात. ठाणे जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात त्यांना पाठवण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं गुरू शिक्षाचे नाते होते. परंतु बाळासाहेबांच्या बाजूचे त्यांना आनंद दिघेंची लोकप्रियता खूपत होती असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.