Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, नागपूर आणि रामटेक या पाच जागांवरही मतदान झाले. या दरम्यान, काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी देशातील मतदारांना काँग्रेस पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन केले. 'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालवू नका, त्याऐवजी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करा, असे निरुपम म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आज 21 राज्यांतील 102 जागांसाटी मतदान झाले. यादरम्यान संजय निरुपम म्हणाले की, मी मतदारांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करण्याचे आवाहन करू इच्छितो. काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालवू नका. काँग्रेस एक जुनी इमारत आहे, जी जुने आणि थकलेले नेते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते स्वतःची परिस्थिती बदलू शकत नाहीत, तर देशाची परिस्थिती काय बदलणार, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, पक्षविरोधी वक्तव्यांमुळे निरुपम यांची या महिन्याच्या सुरुवातीला काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे निरुपम नाराज होते.काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी केला होता. पक्षातून बाहेर आल्यानंतर निरुपम सातत्याने काँग्रेस आणि पक्षातील नेत्यांवर टीका करत आहेत.