Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
By बाळकृष्ण परब | Published: June 3, 2024 09:46 AM2024-06-03T09:46:32+5:302024-06-03T09:48:23+5:30
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशपातळीवरील एक्झिट पोल पाहिल्यावर त्यामधील आकडे वेगवेगळे असले तरी कल सुस्पष्ट दिसत आहे. पण महाराष्ट्रातील संभाव्य निकालाबाबत एक्झिट पोल कमालीचे कन्फ्युज असल्याचे दिसताहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील संभाव्य निकालाबाबत (Maharashtra Lok Sabha Election 2024) असलेली उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
- बाळकृष्ण परब
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील सर्वात अटीतटीची लढत ही महाराष्ट्रात झालीय, असे संकेत मिळत आहेत. मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ, राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये झालेली फोडाफोडी, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीत जनमताचा कौल काय असेल, याबाबत फार उत्सुकता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीपासून ते आता मतदान आटोपून निकाल लागण्याची वेळ आली तरी जनमताच्या अचूक कौलाची नाडी पकडण्यात भलेभले अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यामुळेच की काय सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, राजकीय जाणकार आणि आता एक्झिट पोल; कुणालाच महाराष्ट्रातील संभाव्य निकालाबाबत अचूक दावा करता येत नाही आहे. खरं तर एक्झिट पोलमधील आकडे चुकू शकतात, पण तरी त्यातून जनमताचा कौल कुठल्या बाजूने राहील, कोण आघाडीवर राहील आणि कोण पिछाडीवर पडेल, याचा अंदाज येतो. देशपातळीवरील एक्झिट पोल पाहिल्यावर त्यामधील आकडे वेगवेगळे असले तरी कल सुस्पष्ट दिसत आहे. पण महाराष्ट्रातील संभाव्य निकालाबाबत एक्झिट पोल कमालीचे कन्फ्युज असल्याचे दिसताहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील संभाव्य निकालाबाबत असलेली उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
आता राज्यातील राजकीय पक्षांकडून करण्यात येत असलेले दावे, राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत असलेले अंदाज आणि एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत असलेल्या शक्यता विचारात घेता महाराष्ट्राच्या संभाव्य निकालाबाबत तीन शक्यता समोर येत आहेत. त्यातील पहिली शक्यता म्हणजे राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यात बरोबरीचा सामना. या शक्यतेनुसार महायुती आणि महाविकास आघाडी हे २२ ते २६ जागांदरम्यान राहू शकतात. म्हणजेच या दोघांपैकी जो आघाडीवर राहील आणि जो पिछाडीवर पडेल त्यांच्यामध्ये जागांचं फारसं अंतर नसेल. बहुतांश एक्झिट पोलमधून महायुती आणि महाविकास आघाडी यांना याच रेंजमध्ये जागा देण्यात आल्या आहेत. आता या शक्यतेनुसार निकाल लागला आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला एखाद दुसऱ्या जागेची आघाडी मिळाली. तरी तो मोठा विजय मानला जाईल. तर महायुती २२ ते २६ जागांदरम्यान अडखळली तर त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असेल.
आता दुसरी शक्यता विचारात घ्यायची झाल्यास काही एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीला २८ ते ३२ आणि महाविकास आघाडीला १६ ते २० जागा देण्यात आल्या आहेत. राज्यातील सध्याची परिस्थिती, देशपातळीवर असलेला मोदींचा प्रभाव आणि विविध मतदारसंघात असलेली स्थानिक समीकरणं पाहता ४ जूनला लागणाऱ्या निकालामध्ये अशा प्रकारचं चित्र दिसण्याची शक्यता अधिक आहे. आता या शक्यतेनुसार महायुतीला २८ ते ३२ जागा मिळाल्या तर अटीतटीच्या लढतीत महायुतीने किमान प्रतिष्ठा राखली, असं म्हणावं लागेल. तर प्रतिकूल परिस्थितीत महाविकास आघाडीला १६ ते २० जागा मिळवल्या तरी ते त्यांच्यासाठी यशच मानलं जाईल.
आता महाराष्ट्रातील निकालाबाबत तिसऱ्या शक्यतेचा विचार करायचा झाल्यास एक दोन एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीला ३३ ते ३७ आणि महाविकास आघाडीला ११ ते १५ जागा देण्यात आल्या आहेत. सध्याचं वातावरण पाहता असं घडण्याची शक्यता फार कमी दिसतेय. मात्र सुरुवातीच्या टप्प्यातील चुका दुरुस्त करण्यात आलेलं यश आणि अटीतटीच्या लढती असलेल्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लावलेल्या सभा यांचा प्रभाव पडला तर महायुती हा टप्पा गाठू शकेल. तसेच एवढ्या जागा जिंकल्या तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीसाठी खूप महत्त्वाची बाब ठरेल. मात्र, दुसरीकडे केवळ ११ ते १५ जागांवर समाधान मानावे लागल्यास महाविकास आघाडीसाठी तो फार मोठा धक्का असेल. तसेच असं घडल्यास चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो.
एकंदरीत निवडणुकीदरम्यानचं महाराष्ट्रातील वातावरण आणि आता एक्झिट पोलमधून समोर आलेले कल पाहता देशात पुन्हा एकदा मोदीलाट प्रभावी ठरत असली तरी महाराष्ट्रात मोदी लाटेपेक्षा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना असलेल्या सहानुभूतीची लाट आणि स्थानिक मुद्दे प्रभावी ठरल्याचे दिसत आहे. आता निकालांमध्येही तेच चित्र दिसलं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल. पण या सर्वावर मात करत ३० हून अधिक जागा जिंकल्या तर मात्र महायुतीला विधानसभा निवडणुकीत ॲडव्हान्टेज राहील.