PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 19:39 IST2024-05-17T19:35:23+5:302024-05-17T19:39:00+5:30
'विरोधकांकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही. पण, आम्ही सातत्याने विकासाबद्दल बोलतोय.'

PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाचा दिवस आहे. राज्याची राजधानी मुंबईत सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकाच दिवशी सभा होत आहे. एकीकडे मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महायुतीने सभा आयोजित केली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीची सभा बीकेसी मैदानावर होत आहे. महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह अनेक नेते उपस्थित आहेत.
अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणतात, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला. गेल्या दहा वर्षात मोदींनी देशाला पुढे नेण्याचे काम केले. त्यांचे कणखर नेतृत्व देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. म्हणूनच आपल्याला तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प करायचा आहे.'
'विरोधकांकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही. आम्ही सातत्याने विकासाबद्दल बोलतोय. पण विरोधक त्याला फाटा देत आहे. नको ती भाषणं करत आहेत. विरोधकांची भाषणं काढून बघा...त्यांचे शब्द बघा...आपण महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य म्हणतो, पण कुठल्या प्रकारची भाषा वापरतात. विरोधक कुठलाही मुद्दा काढून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.'
'गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. पण, विरोधकांकडून संविधान बदलण्याची भाषा वापरली जात आहे, हे थांबलं पाहिजे. ते काम तुमच्या मतातून करता येईल. सर्वांनी महायुतीला मतदान करुन विरोधकांना जशासतसे उत्तर द्यायला हवे,' असे आवाहनदेखील त्यांनी उपस्थितांना केले.