मुंबई - Sandeep Deshpande on Sanjay Raut ( Marathi News ) ज्या दिवसापासून आम्ही पाठिंबा जाहीर केलाय तेव्हापासून उबाठाच्या तंबूत भीती पसरली आहे. त्यामुळे जुने काहीतरी काढण्याचं सुरू आहे. राऊतांना उबाठा संपवण्याची सुपारी शरद पवारांनीच दिलीय असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केला.
संदीप देशपांडे म्हणाले की, संजय राऊतांच्या जुन्या गोष्टी काढल्या तर पळताभूई थोडी होईल. जुन्या गोष्टी काढल्या तर संजय राऊतांच्या पार्श्वभागाला पाय लावून पळायला लागेल अशी त्यांची परिस्थिती होईल. सुपारी जर गळ्यात अडकली तर गिळताही येणार नाही, बाहेरही काढता येणार नाही. त्यामुळे सांभाळून बोला. जुन्या गोष्टी सगळ्यांच्याच काढल्या तर कुणालाच तोंड दाखवायची जागा उरणार नाही. राजकीय आरोप प्रत्यारोप होते त्या होत राहतात. पण ज्यापद्धतीने सत्तेसाठी संजय राऊत इथून तिथून उड्या मारतात. शरद पवारांच्या मांडीवर बसतात त्याला सुपारी घेणे म्हणतात. राऊतांना उबाठा संपवण्याची सुपारी शरद पवारांनीच दिलीय. ते काम राऊत व्यवस्थितपणे करतायेत असा टोला त्यांनी लगावला.
त्याशिवाय जितेंद्र आव्हाडांना कुणाचा शेवट जवळ आलाय हे सांगण्याची लायकी नाही. राज ठाकरे संपवणारे संपले, हे जितेंद्र आव्हाडांनी लक्षात ठेवावे. आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी स्वत: महायुतीच्या प्रचारात उतरलोय. त्यामुळे उबाठा गटात भीती आहे. यांच्या आरेला कारे करणारे हे महाराष्ट्र सैनिकच आहेत. यांची चिल्लीपिल्ली माहिती आहे. आज गुजरातींबाबत बोलतात. जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, केम छो वरली हे बोर्ड कुणी लावले? त्यामुळे मराठीवरील यांचे प्रेम बेगडी आहे. जेव्हा मतदान हवे असते तेव्हाच या लोकांना मराठी माणूस आठवतो. २५ वर्ष महापालिकेत असताना मराठी माणसांसाठी काय केले? जे मराठी माणसं मुंबईत राहत होते. त्यांना कल्याण डोंबिवली, वसई विरार, नवी मुंबईत पाठवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले असा सवालही संदीप देशपांडे यांनी विचारला.
दरम्यान, शिवतीर्थाने अनेक ऐतिहासिक सभा पाहिल्या. आचार्य अत्रेपासून बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांची सभा पाहिलीय. त्यात इतिहासाच्या पठडीतील अजून एक सभा १७ तारखेला शिवतीर्थावर नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची होईल असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.